Take a fresh look at your lifestyle.

अशांततेची कारणं शोधायला हवीत !

त्याशिवाय शांततेकडे वाटचाल होणार नाही.

आपण अशांत आहोत हे सर्वांना कळते पण शांतता मिळवण्यासाठी इच्छुक फारच कमी आहेत. पिसाळलेलं कुत्रं मागे लागल्यावर जशी विचारांची पिकं गळुन पडतात.हुशारी गायब होते,इतकचं काय पण रुबाबात चालणही विसरून जातो आपण.जीव वाचवणे इतकचं ध्यानात असतं.वाट दिसेल तिकडे,आडोसा मिळेल तिकडे जीवाच्या आकांताने पळत सुटावे लागते.अशा स्थितीत चांगले विचार डोक्यात राहणं शक्य आहे का?
एक भिक्षुक रस्त्याच्या कडेला भिक्षा मागत होता.रस्त्याच्या पलीकडुन चाललेल्या एका शेटजींचे लक्ष त्याच्या कडे गेले.त्यांनी आपले पाकीट काढले त्यातुन शंभराची एक नोट बाहेर काढली आणि ती त्या भिकाऱ्याला देण्यासाठी ते रस्ता ओलांडु लागले.इतक्यात एका बाईकस्वाराने त्यांना धडक मारली.शेटजी खाली पडले,ओरडु लागले.भिकारीच मदतीला आला.त्यांनी शेटजींना उचलले,दवाखान्यात नेले.किरकोळ दुखापत झाली असल्याने डॉक्टरांनी मलमपट्टी केली.शेटजी स्वतःउठून चालु लागले.न रहावुन भिकारी म्हणाला,शेटजी ते तुम्ही मला भिक्षा देण्यासाठी येत होतात,हातात शंभराची नोट घेऊन…शेटजी म्हणाले चल निघ..तुझ्यामुळेच झालं हे.भिकारी बिचारा हात हलवत निघून गेला.
सज्जनहो प्रपंच याहुन कठीण आहे. तिथं अनेकदा परोपकार करण्याची इच्छा होते पण आपल्याकडे येणाऱ्या अनेकांना हात हलवत मागे जावे लागते.कारण प्रपंचाच्या धडका विचार बदली करतात. स्वार्थ शिकवतात.दुसऱ्याला भिकारी समजण्याची वृत्ती नुकसानदायी ठरते.सामान्य माणुसच मदतीला येतो पण त्याचा सत्वभाव आम्हाला कळत नाही. ही प्रपंचाची दगदग आम्हाला अशांत करतेच.पण नवीन विचार प्रवेशण्यासाठी जागा मिळत नाही तो पर्यंत सारं अशक्यच.
चला चांगले विचार येण्यासाठी जागा निर्माण करुया.एक पायवाट त्यासाठी कायम मोकळी ठेवू.
तुकोबाराय म्हणतात, भोग भोगावरी द्यावा।संचिताचा करुनी ठेवा।।
शांती धरणे जीवासाठी।दशा उत्तम गोमटी।।
शांती धारण करण्याइतकी उत्तम स्थिती दुसरी नाही.संचिताने प्रारब्धभोग येणारच.संचितात चांगली ठेव जमा होईल याची काळजी घेतली की मग येणारे भोग आनंदाने भोगता येतात.
रामकृष्णहरी