पारनेर / शिरूर : उत्तरेकडील पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य सकाळ पासून रांजणगाव एमआयडीसी परिसरात सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे.
पुण्यामुंबई सह राज्यातील अनेक जिल्ह्यात धुळीचे वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. रांजणगाव एमआयडीसी सह जिल्ह्याभरात दुपारपासून अचानक जोरदार वाऱ्यासह धुळीच वादळ पाहायला मिळत आहे. पुणे नगर रस्त्यावर शिरूर पर्यंत शहरात धुळीच्या वादळामुळे हवा दूषित झाल्याचे दिसून येत आहे.
आज पाकिस्तानातून सुटलेल्या धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात धडकले. पाकिस्तानकडून निघालेले हे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. याशिवाय मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे.
धुळीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
▪️’असे’तयार होते धुळीचे वादळ !
अनेकविध आविष्कारांमुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण किंवा वालुकाकण भूपृष्ठावरून हवेत बऱ्याच उंचीपर्यंत फेकले जातात, अशा आविष्कारांच्या समूहाला धुळी वादळ असे म्हणतात. वाळवंटी परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास तेथून धूळ उंचावर उडते आणि ही धूळ पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये मिसळते. त्यामुळे वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर धुळ कित्येक किलोमीटरचा प्रवास करतात आणि धुळीचे वादळ निर्माण होते. साधारणपणे अशी वादळे देशात उत्तरेकडील काही राज्यांपर्यंत प्रवास करतात. महाराष्ट्रात धुळीच्या वादळांचे प्रमाण कमी असते.
▪️किती उंच जातात धुळीचे कण ?
धुळी वादळात धुळीचे सूक्ष्मकण ५,००० मी. उंचीपर्यंत सहजगत्या उचलले जातात आणि उच्च वातावरणातील वाऱ्यांच्या साहाय्याने उगमस्थानापासून ते शेकडो किंवा हजारो किमी.पर्यंत दूर जाऊ शकतात. ते वातावरणात बराच वेळ तरंगत राहू शकतात. वालुकावादळात सापडलेल्या कणांचे आकारमान सापेक्षतः बरेच मोठे असल्यामुळे वालुकामेघ क्वचितच २ मी. पेक्षा उंच जातो व त्यातील वालुकाकणही उगमस्थानापासून फार दूरपर्यंत पसरले जात नाहीत. २० ते ३० मी. उंचीपर्यंत वर फेकले गेलेले वाळूचे कण अल्पावधीतच थोडेसे अंतर गेल्यानंतर जमिनीवर पडतात.