Take a fresh look at your lifestyle.

आम्ही प्रत्येकजण शेतकरीच आहोत !

आम्हाला हक्काचं शेत मिळालेलं आहे.

संत सावता महाराज म्हणतात, आमची माळीयाची जात।शेत लावू बागाईत।। आमची माळ्याची जात आहे त्याला पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. कोणती परंपरा आहे?तर नित्यनेमाने शेतीची मशागत करणे,चांगले बीज निवडणे,पेरणी करणे आणि भरघोस पिक घेणे हा जसा प्रत्येक शेतकऱ्याचा धर्म आहे. तसाच हा धर्म आमच्या शरीर नावाच्या शेतीशी संबंधीत आहे.शरीर शेती आहे आणि त्यात जो चैतन्य रुपाने ‘मी’आहे तो म्हणजे माळी.
माऊली म्हणतात, तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे । जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥१३
अर्जुना ऐक,या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. आपण आपल्या शेतीला क्षेत्र संबोधतो.म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ नातं तयार होतं.शरीर नावाच्या क्षेत्राची ओळख होणं सामान्य बाब नाही. ती ओळख झाली की मग तन माजण्याचं कामच रहात नाही, ती शेती पडिक रहाण्याचा संभवच नाही. माऊली म्हणतात, आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके । म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो. जिराईत आणि बागाईत अशी दोन प्रकारच्या क्षेत्रात आपण शेती करतो.जिराईत क्षेत्रात बारमाही उत्पन्न घेता येत नाही. पण शेती जर बागाईत असेल तर बारमाही उत्पन्न घेता येते.पण ही शेती कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरुन विठ्ठल दर्शनाचं पिक या शेतीत येईल?त्याची प्रक्रिया सांगताना सावता महाराज म्हणतात, आम्हा हातीं मोट नाडा।
पाणी जातें फुलझाडा।।
आमच्याकडे कोणती मोट आणि कोणता नाडा आहे? की जी मोट हाकल्याने पाणी फुलझाडांना जाणार आहे!पुर्वी शेतीला पाणी देण्यासाठी बैलांना जुंपून मोट हकावी लागायची.ती मोट नाड्याच्या सहाय्याने विहिरीतील पाणी पाटात आणुन शेतात पाटाच्या सहाय्याने नेले जायचे.आमच्या श्वासोच्छ्वासाव्दारे अहोरात्र सुरू असलेली मोट.या श्वासाने शरीर नावाची शेती करता येते.दोन मुख्य नाड्यांनी ही मोट चालते,ती म्हणजे इडा आणि पिंगळा नाडी.श्वासांचं आत येणं आणि बाहेर जाणं हे अविरत चालु आहे. ही मोट थांबली की झाड आडवं होतं.उर्वरित उद्याच्या भागात.
रामकृष्णहरी