बिहार : तुमच्या खात्यात अचानक साडेपाच लाख रुपये जमा झाले, तर काय होईल? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही याची माहिती आपल्या बँकेला द्याल. बिहारमधील खगडियामध्ये एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला. त्यांच्या बँक खात्यात अचानक साडेपाच लाख रुपये आले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने ते सर्व पैसे खर्चही केले.
बँकेने नोटीस पाठवून खातेदार रंजीत दास नावाच्या व्यक्तीकडून पैसे परत मागितले अन् या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पण खातेदार रंजीत दासने पैसे परत करण्यास नकार दिला. ‘पैसे परत का देऊ, हे पैसे तर पंतप्रधान मोदींनी पाठवले आहेत’, असे रंजीत दास म्हणाले. रंजीत दास यांनी पैसे परत करण्यास नकार दिल्यावर हे प्रकरण पोलिसात गेले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
खगडियाच्या ग्रामीण बँकेने चुकून बख्तियारपूर गावात राहणाऱ्या रंजीत दास यांच्या खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा केले. चूक झाल्याचे बँकेला कळताच त्यांनी पैसे परत घेण्यासाठी रंजीत दास यांना नोटीस पाठवली. पण पैसे खर्च केल्याचे सांगत रंजीत दास यांनी ते परत करण्यास नकार दिला.
या वर्षी मार्चमध्ये आपल्या खात्यावर अचानक साडेपाच लाख रुपये जमा झाले. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले, त्यातील ही पहिली रक्कम असेल, असे आपल्याला वाटले. यामुळे सगळे पैसे आपण खर्च केले. आता माझ्या बँक खात्यात काहीच पैसे नाहीत, असे रंजीत दास यांनी सांगितले. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून मानसी पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक कुमार यांनी रंजीत दास यांना अटक केली. आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.