Take a fresh look at your lifestyle.

सुंदर आयुष्याची पायाभरणी सुंदरच असली पाहिजे !

त्यासाठी झिजावचं लागतं.

उद्याचा दिवस सुंदर असलाच पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं पण प्रत्येकाला तो सुंदर जातो का? दिवस सारखाच असतो पण प्रत्येकाच्या कर्मानुसार तो चांगला जाईल की वाईट हे ठरत असतं.दुःखानं जर्जर झालेली माणसं पाहिली की पहाणाराला यातना होतात.पण हे दुःख वाटुन घेता येत नाही.

व्यसनाधीन व्यक्तिला आजाराने घेरले की मग पुढचं सगळं थांबतं.हे एकाएकी घडलय का?नाही ते एकाएकी घडलं नाही. त्याची रुजवात व्यसन स्विकारलं तेव्हाच झाली. कालावधी खूप गेल्याने पायाभरणीचा विसर पडला. थोडक्यात काय तर जे पेराल तेच उगवणार आहे.
माऊली म्हणतात,
जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे ।
कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥७४॥
ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्यावाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पहावे तेच त्यांना त्यात दिसते ॥७४॥
शेतात काय पेरलय हे पेरणी होऊन गेल्यावर दुसऱ्याला काय पेरलय हे सांगता येत नाही.जसं नुकतच पेरलेलं बीज मातीआड गेल्याने दिसत नाही. पण ते ज्याक्षणी मातीत गाडले जाते त्याक्षणी तू रुजायला सुरुवात होते.कालानुरूप बीजकोंब बाहेर येतो.आणि पहाता पहाता त्या बिजकोंबाचा वृक्ष होतो. किंवा आरसा खोटं दाखवत नाही. जसं आहे तसं दाखवण्याचं काम आरसा करतो.
सज्जनहो उद्या आमचं भविष्य काय असेल हे हातांच्या रेषेवर कसं ठरवता येईल?या हातांनी काय कर्म केलं आहे हे मनदर्पन दाखवत असतं.पण हा आरसा आपला आपणच पहायचा असतो.तो दुसऱ्याला पहाता येत नाही. आणि दिसला तरी दुसऱ्याला त्याचा काय लाभ? लाभहानी आपली आपल्यालाच भोगावी लागणार आहे. म्हणुन पायाभरणीच उत्तम असावी हा आग्रह आपणच आपल्याला केला पाहिजे. त्यावर आयुष्याची इमारत उभी रहाणार आहे. डौलदार इमारत दुसऱ्यांनाही प्रेरणा देते.तसं घर बांधण्याचा मोह कुणाला झाला तर तो जीवनाचा सार्थकक्षण असेल.
रामकृष्णहरी