धर्म ह्या शब्दाचे अनेक अर्थ शब्दकोशात आढळतात. मुख्यतः धर्म हा शब्द आज्ञा, रूढी, कर्तव्य, अधिकार, न्याय, नीती, गुण, चांगली कृत्ये व कर्म ह्या अनेक अर्थांनी वापरला जातो.धर्माची व्याख्या युगपरत्वे बदलत गेली आहे. त्यात शिथिलता आली आहे हे अगदी सर्वमान्य आहे.
धर्म जोपर्यंत जातीशी ,अध्यात्मिकतेशी,संप्रदयांशी जोडला जात नाही तोपर्यंत त्याचं मुळ तत्व बदलत नाही.कारण धर्म हा जगतजीवनाचं प्रतिनिधित्व करतो.धर्म एकमेकांना जोडण्याचं काम करतो.धर्म जातीपातीत अडकत नाही,तसेच तो कोणत्याही जातीचा,संप्रदायाचा पुरस्कर्ता नाही तसेच तो कुणाचा द्वेषही करत नाही.
या विश्वात अमुक एका व्यक्तीने धर्म निर्माण केला असं ठळकपणे मांडता येत नाही. कारण मनुष्याने निर्माण केलेला मनुष्यधर्म हा मनुष्याच्या प्रगल्भतेचं फळ आहे.तो केवळ मानवतेशी निगडित आहे. आणि त्याची परिभाषा काळानुरूप बदलत राहिली आहे. उदाः पुर्वी लहान वयात लग्न करण्यास समाजमान्यता होती आता त्यात बदल झाला.इतकेच नाही तर बालविवाह आता गुन्हा ठरतो.ही धर्माची बदललेली परिभाषा आहे.अशा कितीतरी गोष्टी आहेत. पुर्वी धान्य जात्यावर दळलं जायचं आता ते गिरणीत दळलं जातं, हे जसं आपसूकच स्विकारलं गेलं तसं धर्म विचारांचं परीवर्तन आहे.
पण कितीही परिवर्तन झालं तरी मुळ ढाचा बदलता येत नाही. तो म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतःच्या इच्छेने जगण्याचा अधिकार.
सध्या आपण ज्याला धर्म म्हणतो,तो जातीशी जोडला गेला आहे. त्याने जातीनिहाय धर्मरचना झाली. हे चांगले आहे की वाईट आहे हा विचार दूरचा आहे. पण धार्मिक म्हटलं की जे डोळ्यासमोर उभं रहातं ते किती खरं आणि किती खोटं?हे सदविवेकानच शोधण्याची वेळ आली आहे.
सज्जनहो धर्माची परीभाषा नव्यानं लिहण्याची वेळ आली आहे.जो धर्म रक्षण करु शकत नाही तो धर्म असेलच कसा?आज आमच्या पोरीबाळी सुरक्षित आहेत का?नको त्या घटना दररोज घडत आहेत. कोणत्या धर्माने हा व्याभिचार मान्य केला आहे? धर्म रोज मरत आहे. धर्माला ग्लानी आली आहे.हे मान्यच करावं लागेल.भगवंत गीतेत म्हणतात,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माची हानी होते,अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।”
सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा विनाश करुन मी धर्माची पुनर्स्थापना करत असतो.
आता आत्मपरीक्षण केले पाहिजे. आम्ही नेमके कोणत्या पक्षात आहोत हा ही चिंतनाचा विषय आहेच.श्रीकृष्ण कुणाला होता येईल हा खरा धर्मविचार आहे असं मला वाटतं.तो शिवछत्रपतींचा विचार आहे.रांझ्याच्या पाटलानं केलेला बलात्कार हा शेवटचा ठरला.पुन्हा ते कृत्य करायला कुणी धजावलं नाही. ही धर्मसंस्थापना आहे.धर्मसंस्थापनेचा तो महामेरू आहे. नुसते फोटो लावुन भागणार नाही. काळजात उतरलं पाहिजे.