पारनेर :”पवार साहेब, आम्हाला पाणी द्या पाणी, पाण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे” असे सांगत विधानसभा निवडणूकीत सिंचनाच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याचा नारा देणाऱ्या आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. तालुक्यातील १२७ गावतलाव व पाझरतलाव दुरूस्तीसाठी तब्बल २४ कोटी ५३ लाख ६ हजार रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. अजूनही काही तलावांच्या दुरूस्तीसाठी लवकरच निधी मंजुर होणार असून तलाव दुरूस्तीसाठी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. नगर जिल्हयात मंजुर निधीमध्ये पारनेर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.
विधानसभा निवडणूकीत पाण्याचा नारा देणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी निवडणूकीनंतर महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. कुकडी प्रकल्पातील तालुक्याचे हक्काचे पाणी देण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली आहे. तर राळेगणसिध्दीसह इतर गावांच्या पाणीयोजनेचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. वडझिरे येथील शिवडोहच्या लिंककालव्यास मंजुरी मिळाली असून हे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. पावसाचे पाणी विविध तलावांमध्ये आडविण्यात आल्यानंतर गळतीमुळे हे पाणी वाहून जात होते. तलाव दुरुस्तीसाठी आ. लंके यांनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केले होते. त्यांना निधी मंजूर झाला असून आता सर्व पाझर तलावांची दुरूस्ती होणार असल्याने लवकरच सिंचनाचा वाढलेला टक्का दृष्टीक्षेपात येणार आहे.