Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात ‘येथे’ बहरले प्रति कास पठार !

लक्षवेधी फुलांचा अप्रतिम नजारा फुलला !

कर्जत : फुलांचे ताटवे म्हटलं की आपल्याला कास पठार आठवतं… पण तुम्हाला आता हेच फुलांचे ताटवे पहाण्यासाठी कास पठाराला जाण्याची गरज नाही. होय! आता आपल्याच नगर जिल्ह्य़ात प्रती कास पठार बहरले आहे ते कर्जत तालुक्यातील कुंभेफळ वनक्षेत्रात! याठिकाणी दुर्मिळ पण तितक्याच लक्षवेधी फुलांचा नजराणा बहरला आहे. सध्याच्या उन पावसाच्या खेळात फुलांचा हा उत्सव चांगलाच रंगला आहे… मग आहात ना हा रंगीबेरंगी लक्षवेधी फुलांचा नजारा डोळ्यात साठवून घेण्यासाठी तयार…

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरू झाला, की उन्हाने गवताची कायली व बोडक्या झालेल्या कुंभेफळच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते. जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते. ऑगस्टच्या अखेरीस सर्व प्रकारची फुले थोडय़ा प्रमाणात यायला सुरुवात होते. पावसाची संततधार व कधी कधी धुक्याची दाट चादर कमी झाल्याने, उन वाढल्याने पठार विविधरंगी फुलांनी बहरते. सद्य:स्थितीत लाल रंगाचा तेरडा, कीटकभक्ष्यी निळी सीतेची आसवे, पांढरे चेंडच्या आकारासारखे गेंद, वायतुरा, पिवळी सोनकी, चवर (रानहळद), पंद, पांढरी तुतारी विविध प्रकार आदी फुले पठारावर उमलली आहेत.

सध्या हे ठिकाण दुर्लक्षित असले तरी कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर भविष्यात हेच ठिकाण मोठे पर्यटनस्थळ बनू शकते. कास कडे वळणारी निसर्गप्रेमींची पावले इकडे वळू लागली तर आश्चर्य वाटू नये. इतका अप्रतिम नजारा सध्या याठिकाणी फुलला आहे.

कर्जतचे आमदार रोहीत पवार ही या ‘प्रती कास’ पठाराच्या प्रेमात पडलेत त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करुन त्यामध्ये म्हटले आहे की, कदाचित तुम्हाला माहीत नसेल.. माझ्या मतदारसंघातही कुंभेफळ (ता. कर्जत) वनक्षेत्रात अशा प्रकारच्या विविध फुलांचे ताटवे बहरले आहेत.. हा नयनरम्य नजरा बघायची संधी तुम्हीही सोडू नका!