कोणतेही ज्ञान ग्रहण करताना चित्त स्थिरावलेले असले पाहिजे. आपण घेत असलेल्या ज्ञानाचे फलश्रुती चित्र आधीच चित्तात तयार झाले पाहिजे. त्याशिवाय ते ज्ञान आत्मसात होत नाही.मनाची चंचलता स्थिरावु देत नाही हा सगळ्यांचाच अनुभव आहे.लक्ष समोर उघड्या डोळ्यांना दिसत नसताना ते प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे?
खरंतर यावर फार गांभीर्याने विचार होत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला तुझं अंतिम लक्ष्य काय आहे?असं विचारलं तर निश्चित उत्तर मिळत नाही. असं झालं तर तसं करता येईल.अशी गुळगुळीत उत्तरं असतात.शिवाय एखाद्याने धाडसाने उत्तर दिलेच तर पुढची पुर्तता आडवी येण्याची शक्यता असते.विद्यार्थी दशेतल्या कोणत्याही कार्याची फलनिष्पत्ती सभोवतालच्या त्यातही कौटुंबिक स्थितीवर अवलंबून असते.पण असं असलं तरी मनाचा निर्धार त्याला सगळ्यातुन मार्ग काढुन देतो.
परिस्थिती आडवी येत नाही. कारण निर्धाराने मनोबल तयार होते.कितीही कष्ट,यातना सहन करण्याची शक्ती तयार होते.पण या सर्वामागे एकच तंत्र आहे,ते म्हणजे एकाग्रचित्तावस्था मिळवता येणे.सर्व यशाची गुरुकिल्ली हिच आहे.
मनातला कोलाहल थांबवण्यासाठी पहिल्यांदा बाहेरचा कोलाहल बंद करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एकांत स्थान निवडणे क्रमप्राप्त आहे. स्वतंत्र खोली असेल तर उत्तम.सुखासनात डोळे मिटून शांत बसावे.अनेक विषय गर्दी करुध यायला सुरुवात करतील.येऊद्या,काय यायचे ते विचार येऊद्यात.फालतु विचार हकलण्याचे प्रयत्न करा.क्लेश देणारे विषय वजा करताना खरा त्रास होणार आहे. पण ज्ञानवंत व्हायचं असेल तर क्षमाशील वृत्ती निर्माण करावीच लागेल.
क्लेश ज्यामुळे होतोय त्या व्यक्तीला अंतकरणातुन क्षमा करा.काही विषय क्षमा करण्यायोग्य नसतीलही पण हे धाडसी पाऊल उचलावच लागेल.दुध घेण्याच्या भांड्याला मिठ चिकटले असेल तर दुध नासणारच हे सांगायची गरज आहे का?या चित्तरुपी भांड्यात वाईट विचारांचा नाममात्र मिठाचा अंश राहिला तर सदविचारांचं दुध नासणार आहे. क्लेश देणारे क्षण मनातुन हाकलले नाही तर भविष्यात त्यात वाढच होत जाणार आहे. कारण हे जीवन आहे. त्यात अनेक अनपेक्षित प्रसंग घडणार आहेत. आपल्या मनाला स्वच्छ रहाण्याची सवय लावावी लागेल.कुणाही विषयी मनात आढी ठेऊ नका.स्वतःचा उत्कर्ष त्यात नाही.स्वतःला घडवण्यासाठी एकांतात हे चिंतन करायला आपण शिकलात तर हळूहळू मन स्थिर व्हायला सुरुवात होईल. चेहऱ्यावर त्याचं तेज आपोआप दिसु लागेल.
मनस्थिती चांगली करायला स्वतःच शिकावं लागेल.चित्त थाऱ्यावर त्या शिवाय येत नाही.अस्थिरता बाहेच्या जग संबंधाने आहे हे कळाले की मग आपली प्रसन्नता बाहेरची कोणतीही गोष्ट घालवु शकत नाही.सुज्ञ पालकांनी आपल्या पाल्यासाठी ही योजना करावी.पुढे याचे अनेक टप्पे आहेत.वेळोवेळी आपण त्यावर चर्चा करुच.