Take a fresh look at your lifestyle.

अजितदादा पवार कोणाच्या गळयात टाकणार अध्यक्षपदाची माळ ?

राष्ट्रवादीच्या "या" आमदारांचे नाव 'टॉप'वर !

✒️ सतीश डोंगरे 
शिरूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आठवडाभरापूर्वी पार पडली. आता बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 15 जानेवारीला अध्यक्षांची निवड होणार असून तिघा जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये शिरूरमधून विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार अशोक पवार यांचे नांव सर्वात आघाडीवर आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या शनिवारी, 15 जानेवारीला दुपारी एक वाजता बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली बैठक बोलावण्यात आली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळणार आहे.
अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाला अध्यक्षपदाची संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत. मात्र या मध्ये अशोक पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 109 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.