Take a fresh look at your lifestyle.

साधनेशिवाय केलेलं सर्व कर्मकांड आहे.

म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे।

गुरु मुख्यत्वे करुन दोन प्रकारचे आहेत.एक मंत्रगुरु आणि दुसरे नामगुरु. मंत्रगुरूंच्या शिष्यांचा प्रवास लौकिक प्राप्तीपर्यंत आहे.त्याने काही अडलेल्या प्रापंचिक व्यथेचे निरसन होईल.पण नामगुरु खऱ्या अर्थाने साधकास मुक्तावस्था प्राप्त करून देतात.(मोक्ष शब्द थोडा संयुक्तिक होणार नाही.)कर्मकांडातुन बाहेर काढतात.

पिढ्यानपिढ्या आलेला चुकीचा संस्कार ते मिटवतात.चुकीचे साठलेले अज्ञान ज्ञानाने दूर सारतात.सदगुरुंची प्राप्ती झाल्यावर हे आपोआपच होऊ लागते.पण सिद्धनामधारक होण्यासाठी नामधारकाला गुरुआज्ञा पाळुन उचित साधना करावीच लागते.डोक्यावर हात ठेवून कृपा होणे असामान्य आहे. अशा चमत्काराची अपेक्षा आपल्याला खड्डय़ात घातल्याशिवाय रहाणार नाही.नामधन मिळाल्यावर खरं जगणं सुरू होतं.आचरण शुद्धीसाठी गुरु काही साधना सांगतात.त्या प्रापंचिकाला सहज शक्य असतात.त्या न करता गुरुचा कितीही जयकारा केला तर पदरात काहीच पडत नाही.

गुरुवचनाचे पालन हाच गुरुंचा जयजयकार आहे.एखादा गुरु तुम्हाला मोक्ष मिळवुन देण्याचे विधान करील पण साधक नाम जोपासना करणार नाही तर ते फोल ठरेल.आधी तुमचा देहाभिमान गळुन पडण्याची क्रिया गुरु वारंवार करून घेतात.शिष्याने त्यास उत्तम प्रतिसाद दिला तर गुरु त्या साधकाला उच्च ज्ञानशिखरावर घेऊन जातात.जीवन जगतानाच मुक्तावस्था प्राप्त होत असते.हे निश्चित समजा.
माऊली हरीपाठात म्हणतात,

सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
सज्जनहो या अभंगाची फोड करुन जो गुरु याची अनुभूती देईल तो सामान्य गुरु नव्हे तोच सदगुरु आहे.मनाचा निर्धार सदगुरु प्रसादाशिवाय होत नाही. नामधारकाला यातील गुह्य समजले असेलच.
रामकृष्णहरी