Take a fresh look at your lifestyle.

सैनिक बँकेत पुन्हा त्याच संचालक नातेवाईकांची नोकर भरती !

शासन आदेशाची व्यवस्थापकाकडून पायमल्ली.

पारनेर : तालुका सैनिक सहकारी बँकेत तात्पुरती नोकर भरती करण्यात आली असून त्यात मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे व संचालकांच्या त्याच नातेवाईकांना पुन्हा सेवेत घेतले असून सहकार खात्याच्या संचालक नातेवाईक नोकरबंदीच्या आदेशाला हरताळ फासला असून मुदत वाढ मिळालेल्या संचालक मंडळाला सहकार खात्याने हटवून प्रशासक लावावा अशी मागणी संचालक सुदाम कोथिंबिरे , कॅप्टन विट्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाठ, मारुती पोटघन, विनायक गोस्वामी,विक्रमसिंह कळमकर यांनी सहकार आयुक्तांना पत्राने केली आहे.
सहकार आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे व संजय तरटे,कॅप्टन नामदेव काळे,शिवाजी सुकाळे बबनराव सालके व इतर काही संचालकांनी आपल्या नातेवाईकांना बँकेच्या सेवेत घेतले आहे.२०२० साली झालेल्या कर्मचारी भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झालेले होते. त्यामूळे सदर नोकर भरती रद्द करावी लागली होती. आता त्याच नातेवाईकांना पुन्हा सेवेत घेतले असल्याने सदर भरती मुळे बँकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे.आपल्याच घरातील आप्तस्वकीयांना मागील दाराने संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रकार सैनिक बँकेत घडला आहे.त्यामुळे सहकार खात्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन झाले असून गैरव्यवहारी संचालक मंडळ बरखास्त करावे व या भरतीस स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.
▪️सहकारी बँकांच्या भरतीत संचालकांच्या नातेवाईकांना बंदी.
 राज्यातील नागरी सहकारी बँकांमध्ये नोकरभरती करताना संचालकांच्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे तसे पत्र २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये सहकार आयुक्तांनी बँकांना काढले आहे. या निर्णयामुळे यापुढे बँकेचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही नागरी सहकारी बॅंकांच्या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहे. असे असताना सैनिक बँकेत पुन्हा नातेवाईक घेतले असल्याने ही बँक सभासदासाठी आहे की सत्तारुढ संचालक मंडळासाठी ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
▪️व्यवस्थापकाने नातलगांना घेतले बँक सेवेत!
मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे हे बँकेत गेली पंधरा वर्षांपासून एकहाती, मनमर्जी कारभार करत आहे, संजय कोरडे यांनी बँकेत अनेक गैरव्यवहार केले आहेत त्यासंबंधी त्यांच्यावर आर्थिक गुन्हे दाखल आहेत.संचालकांना नोकर भरतीचे आमिष दाखवायचे व त्यातून स्वताची पोळी भाजून घेयाची असा उद्योग कोरडे यांचा चालला आहे. कोरडेंच्या सुपीक डोक्यातून संचालक निवडणुकीत सत्ता यावी हा हेतू ठेवत दोन वर्षांपूर्वी एकाच दिवशी १४०० नातेवाइकांना नियमबाह्य सभासद केले व संचालकांची १३ नातेवाईक बँक सेवेत घेतले होते मात्र जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घातल्याने १४०० सभासदांना स्थगिती मिळाली तर १३ नातेवाईकांना बँक सेवेतून वगळण्यात आले आहेत. आता पुन्हा तोच फंडा वापरला आहे.
▪️कोरडेंना हटवण्यासाठी रिजर्व बँकेकडे तक्रार !
संजय कोरडे हे बँकेत मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत तर स्वता:च्या हिवरे कोरडा गावात ज्ञानेश्वर माऊली बिगर शेती सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेत संजय बाजीराव कोरडे हे व्हाईस चेअरमन म्हणून पदाधिकारी आहेत.त्या पतसंस्थेतील लिपिकाच्या भावाला बँकेच्या सेवेत घेतले आहे.कोरडे यांनी आतापर्यंत २ ते 3 कर्मचारी बँक सेवेत घेतले आहेत. बँकेत आतापर्यंत झालेले गैरव्यवहार, नातेवाईक नोकरभरती,नातेवाईक सभासद करणे, गैरव्यवहारला साथ न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यामागे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांचा सहभाग असल्याने त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी पदावरून रिजर्व बँकेकडून हटवले जावे यासाठी रिजर्व बँकेकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब नरसाळे,विनायक गोस्वामी यांनी सांगितले.