Take a fresh look at your lifestyle.

वातावरण बदलामुळे शिरुरकर पडले आजारी !

दवाखाने हाऊसफुल्ल; खोकला, ताप,सर्दीचे रुग्ण वाढले.

 

✒️ सतीश डोंगरे 

शिरूर : सध्या शिरुर तालुक्यात वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून खोकला, ताप, साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत. शहरात ही सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. साथीचे आजारही बळावत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

बहुतांश घरांमध्ये या आजाराचे रुग्ण आहेत. काही दिवसांपासून पाऊस, ऊन आणि त्यानंतर थंडीचा जोर कमी-जास्त होत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील थंडी अचानक गायब झाली होती व वातावरण गरम व ऊबदार बनले होते.

त्यानंतरच्या काळात पाऊस सुरू झाल्याने थंडीनेही अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर तापसदृश आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. आधीच कोरोनाचे भूत मानगुटीवर असताना अचानक सुरू झालेल्या खोकला आणि तापामुळे नागरिक घाबरून जात आहेत. हे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात ग्रामीण आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. शिवाय तालुक्याच्या पूर्व भागात डेंग्यू, चिकनगुन्या, टायफॉइड, मलेरियासदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाची आकडेवारी तालुक्यात काहीशी स्थिर असली तरी इतर गंभीर आजाराचे रूग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रांजणगाव – कारेगांव या औद्योगिकीकरण असलेल्या भागातील अशा रूग्णांची संख्या मोठी आहे. हवेतल्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लहान मुलांसहित मोठ्या माणसांनाही आजारांनी ग्रासलं आहे. अनेकांना सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला अशी लक्षणं दिसत आहेत मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन डाॅ. गणेश भडांगे यांनी केले आहे.