Take a fresh look at your lifestyle.

…अन् आमदारांनी दिला बैलगाडीला धक्का !

झाले असे काही की...

सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर – हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांचे प्राणी आणि पक्षांविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडगाव रासाई येथील निवासस्थानी ते मोरांना धान्य भरवित असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. काल पुन्हा एकदा असाच प्रत्यय आला. 
आमदार पवार हे न्हावरे रस्त्याने जात असताना ऊसाने भरलेली एक बैलगाडी थांबलेली होती. बैलगाडीचा मालक हतबल होऊन बैलाला मारत होता. परंतू चढाचा रस्ता असल्याने बैलांना गाडी ओढत नव्हती. 
आमदार अशोकबापूंनी हे दृष्य पाहीले आणि तात्काळ चालकाला गाडी थांबविण्याची सूचना केली. ते स्वतः खाली उतरले बैलगाडीला मागून धक्का दिला आणि गाडी चलती झाली. 
त्यानंतर आमदारांनी संबधित बैलगाडी मालकाला जरा वेळ थांबण्याची सूचना करीत पुढे आपल्या कामासाठी मार्गस्थ झाले. आपल्या बैलगाडीला धक्का देणारे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन होते हे समजल्यावर संबधित ऊस बैलगाडी वाहतूक करणाऱ्या दांपत्याला आश्चर्याचा धक्का बसला. तोपर्यंत आमदार आशोक पवार आपल्या पुढील कामासाठी मार्गस्थ झाले होते.
सोशल मीडियावर आज ही पोस्ट झळकल्या नंतर अनेकांनी आमदार श्री. पवार यांचे कौतुक केले आहे. याबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले,” बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात परंतू अनेकवेळा गाडीमालक हतबल होऊन बैलांना मारहाण करतात हे टाळले पाहीजे. कालचा प्रकार आमच्या समोर घडल्यामुळे मला राहवले नाही. आम्ही स्वतः गाडीला खांदा दिला त्यातून बैलांना ही थोडासा आधार मिळाला आणि बैलगाडी पुढे निघाली. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर उपस्थित नागरिकांनी बैलगाडी मालकांना मदत केली पाहिजे ते आपले कर्तव्य आहे.” 

” गाडीमालकांनी ही प्रमाणापेक्षा जास्त भार बैलांना देऊ नये. जनावरांना अमानुष मारहाण करू नये. त्यांचाही माणसांप्रमाणेच जीव आहे. 
ज्यांच्या जीवावर आपले पोट आहे त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी,” असे आवाहन ही आमदार पवार यांनी केले. 
जाती पेक्षा मातीला जपणारा आमदार… कायम सामान्य राहणीमान असलेले आमदार आशोकबापू पवार. उसाची गाडी अडकलेली असताना आमदार अशोकबापू यांनी स्वतः ढकलत ती उसाची गाडी बाहेर काढत वाट मोकळी केली. याला म्हणतात “नेता नव्हे कार्यकर्ता”. उगाच नाही जनता प्रेम करीत.
शंकर जांभळकर
 मा.सभापती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती