Take a fresh look at your lifestyle.

भाजीपाल्याने गाठली शंभरी !

सर्वसामान्यांचे 'बजेट' कोलमडले !

पारनेर : आठवडाभरापासून भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वांगी व भेंडीने तर शंभरी गाठली असून गवार १२० रूपयांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय अन्य भाज्यांचे दरही गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाईचा निर्देशांक वाढत असून सद्यस्थितीत कडधान्ये, खाद्यतेल यासोबतच भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. गवारसह वांगी व भेंडीला एका किलोसाठी शंभर रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची ‘होम बजेट’ सावरताना मोठी कसरत होत आहे. बटाटा, मेथी व पालक इतर भाज्यांपेक्षा कमी दरात असल्याने दररोजच्या आहारात या भाज्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्याच्या थंडीच्या वातावरणामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, अशा स्थितीत मेथी, पालक, कोथिंबीरची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे या भाज्यांचे दर सध्या तरी बजेटमध्ये आले आहेत.
हिरवी मिरची, वाटाणा, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे दर ६० ते ८० रूपये किलो झाले आहेत. मेथीची गड्डी १५ मे २० रूपयांना तर पालकाची गड्डी १० ते १५ रूपयांना मिळत आहे. कोथिंबीरच्या जुडीचा दर १० रूपये झाला आहे. बटाटा २० रूपये किलो आहे. त्यामुळे नागरिकांचा अन्य भाज्यांऐवजी मेथी, पालक व बटाटा घेण्याकडे कल वाढला असून रोजच्या आहारात या भाज्या दिसून येत आहेत. दिवाळीपूर्वी या भाज्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोथिंबीरची एक जुडी त्यावेळी २५ रूपयांना तर मेथी व पालकाची गड्डी ४० रूपयांपर्यंत गेली होती.
भाज्यांचे दर किलोमध्ये
टोमॅटो ४०, भेंडी १००, वांगी १००, कोबी ४०, फ्लॉवर ८०, सिमला मिरची ८०, हिरवी मिरची ८०, काकडी २०, बटाटा २०, गवार १३०, वटाणा ८०, मेथी जुडी १५ २०, कोथिंबीर जुडी १०, पालक जुडी १०-१५.