Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात दहा दिवसांत शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे !

जिल्हाधिकारी आक्रमक ; कारवाईचाही इशारा !

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रभाव नगर जिल्ह्यातही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आता आक्रमक झाले आहेत.
तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी कामाला लागावे.संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे. याबाबत मी अधिकार्‍यांना पुन्हा सांगणार नाही.ही शेवटची संधी देतो. काम करा अन्यथा कारवाई केली जाणार असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन आता कंबर कसत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे संगमनेर, अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी निवासी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढलेला आहे. लसीकरणा अभावी एकही मृत्यू झाला नाही पाहिजे याची सर्व अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी.
लसीकरणाबाबत काही जणांचा गैरसमज आहे. लसीकरणामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गर्दीचे ठिकाण शोधून याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार्‍यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. तालुक्यातील सर्व सरपंचांची झूम मीटिंग घ्या आणि लसीकरणाबाबत त्यांना सूचना देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले.