Take a fresh look at your lifestyle.

…म्हणूनच मला प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नांबद्दल आत्मीयता !

आमदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

पारनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या अहमदनगर शाखेच्या युवा परिषदेच्या कार्याध्यक्षपदी संदीप फंड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करताना पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न समजावून घेतले. 
यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सहभागातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनादरम्यान ज्या पदाधिकाऱ्यांवर अमानुषपणे गुन्हे दाखल करण्यात आले, ते गुन्हे पाठीमागे घेण्यात यावेत. व १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, १ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगामध्ये प्रचंड अन्याय झालेला आहे . या संदर्भाने मंत्रालयीन पातळीवरून ज्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे, त्या प्राथमिक शिक्षकांवरील अन्याय दुर करण्यात यावा. वेतन आयोगातील प्रमुख त्रुटी दुरुस्त करून या संदर्भाने आपण शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांच्यासमवेत समक्ष चर्चा करावी अशी मागणी यावेळी आमदार लंके यांच्याकडे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी आमदार लंके यांनी सांगितले की मी प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे, याचा मला सार्थ अभिमान असून तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून संधी दिली, त्या संधीचे सोने करीन व प्राथमिक शिक्षकांच्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये मंत्रालयीन स्तरावर तुमच्या शिष्टमंडळासह माननीय शिक्षणमंत्री, अर्थमंत्री तसेच ग्रामविकासमंत्री यांच्या समवेत मंत्रालयामध्ये समक्ष बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळास दिले.
यावेळी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संतोष खामकर यांचा देखील सन्मान आमदार निलेश लंके यांनी केला. संदीप फंड यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये उज्वल भविष्य आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न सातत्याने सोडवावेत व माझ्याकडे सातत्याने मांडावेत. ते सोडवण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेईल असे आमदार लंके यांनी सांगितले.
संदीप फंड यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार निलेश लंके यांच्यासारख्या आदर्शवत आमदाराकडे पाहुनच आम्ही समाजकारणाचे धडे घेत आहोत व त्यांच्याइतके समाजकार्य आम्हाला करता आले नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले.
यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष खामकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब रोहोकले, विकास मंडळाचे सचिव मच्छिंद्र कोल्हे, पारनेर तालुका परिषदेचे अध्यक्ष सुनिल दुधाडे, कार्यकारी अध्यक्ष संदिप झावरे, कार्याध्यक्ष संदीप सुंबे, सरचिटणीस शिवाजी कोरडे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धरम, कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब ठाणगे, कार्याध्यक्ष दत्तात्रय गवळी,सरचिटणीस अशोक गाडगे, संतोष चेमटे, दत्तात्रय चौरे, विनायक ठुबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.