Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांचा संताप : यापुढे गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही !

...अन्यथा राज्यावर लॉकडाऊनची वेळ येवू शकते.

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे साताऱ्यात एका कार्यक्रमात बोलताना जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी किंवा गर्दी होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी १ तास आधीच जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात मोठया प्रमाणात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
या विषयी सविस्तर बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्यात ओमायक्रॉन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये. लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते.”

यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी एक तासभर आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असेही नमूद केले.
“आम्ही नायगावला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती होती तेथे होतो. आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तिथेही आम्ही सरपंच, आमदार अशी सर्वांशी बैठक घेतली. तिथे मी काही बाबी कबुल केल्या आहेत आणि मी त्या देणार आहे. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असे होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे,” असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले.
 “ विधानसभेचे अधिवेशन पाचच दिवसांचे होते. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार कोरोनाग्रस्त झालेत. हे अधिवेशन आणखी वाढवले असते तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार कोरोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तर सभागृहातील व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना आवाहन केले.”
“ कोरोनाचे मोठे संकट जगावर आले आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे गेलेत. काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. आपल्याकडे ज्यांना कोरोना होतो आहे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. घरीच ठेऊन नीट औषधपाणी केले, आराम केला तर बरे होतात. असे असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे,” असेही उपमुख्यमंत्री पवारांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केली असल्याचेही त्यांनी बोलताना नमूद केले.