Take a fresh look at your lifestyle.

दुर्योधन वृत्ती म्हणजे विनाश !

क्रोध म्हणजे वडवानळ.

शब्द हे सुदर्शन चक्र आहे. पण ते सुखदायक असेल तरच सुरक्षित पुन्हा माघारी येते अन्यथा तेच आपल्या विनाशाचे कारण ठरते.’शब्द’ दर्शन,प्रदर्शन,सुदर्शन घडवण्यासाठी समर्थ आहेत.आपली बोलणारी जिभच द्रोपदी आहे हे चिंतन आपण कालच्या भागात केले आहे. शब्दरुपी आलेलं अस्र परतवता आलं पाहिजे.
आपण रामायण,महाभारत श्रवण केलं असेल तर हे आपण ऐकलं असेल की,युद्धात अनेक अस्र एकमेकांवर सोडली जायची.ब्रम्हास्र सोडलं असता शत्रुने त्याला वंदन केले की ते इजा न पोहोचवता पुन्हा माघारी जाते.असं आपण ऐकतो पण सांप्रत जीवन जगताना अशी आलेली अस्र डोळ्यांना दिसत नाहीत. ती शब्द होऊन येत असतात.धारदार शब्दबाणांना नमस्कार करण्याची ताकद अंगात आली तर ते बाण इजा करीत नाहीत.पण हे सहज साध्य होण्यासारखे नाही. असं असलं तरी वेगळी खटपटही करावी लागत नाही. स्थितप्रज्ञ होणं हाच त्यावर उपाय आहे.
दुर्योधनालाही द्रोपदीचं शब्दास्र परतवता आलं नाही.दुर्योधनाकडे काय नव्हतं?सर्व सुखं पायाशी लोळण घेत होती.कशाचीही कमी नव्हती.नितीमत्ता राखता आली असती तर अनेक पिढ्या ऐश्वर्यसंपन्न जीवन जगल्या असत्या.युद्धभुमीवर उभारण्यात आलेली तात्पुरती दालणं सुद्धा सुवर्णमंडीत,सर्व सोईसुविधा, सुखवस्तुंनी खचाखच भरलेली होती.मग प्रत्यक्ष हस्तिनापुरात काय आणि किती असेल?
सज्जनहो हस्तिनापुर समजले का? हे हस्तिनापुर म्हणजे आमच्या शरीरात असेला हाडांचा सापळा आहे. या हस्तिनापुरात सर्व सुखं भोगण्याची लालसा उत्पन्न होते.सर्व प्राप्त झाले तरी हाव थांबत नाही.हिच दुर्योधनवृत्ती आहे ती जन्माला आली की अवेळी विनाश निश्चित आहे. युद्धात जय मिळावा यासाठी गांधारीने दुर्योधनाला वज्रदेही करायचे ठरवले म्हणून विवस्त्र भेटायला बोलावले.पण विकार आडवा आला.जन्मदात्रीपुढे कसली आलीय लाज?तिनचं वस्र घालायला शिकवली त्या आईपुढे आपलं अवघं शरीर शुन्य आहे. पण विकार जागृतीने भगवंताचं निमित्त होऊन का होईना तो लज्जारक्षक वस्र नेसून आईसमोर आला.
गांधारीने डोळ्यावरची पट्टी काढली आणि डोळेभरुन दुर्योधनाला पाहिले.तो वज्रदेही झाला पण वस्राआडचा भाग तसाच राहिला.पुढे युद्धात त्या भागावर शस्त्र प्रहार करुन त्याचा वध झाला.क्रोध आणि त्यासोबत येणारे विकार वज्रदेह्याला सुद्धा वाचवु शकत नाही हा मुख्य संदेश आहे हे ध्यानात घ्यायला हवं.आता गांधारीने असं का केलं?तिने डोळ्यावर पट्टी का बांधली?गांधारी महाभारत काळापुरतीच होती की आजही आहे?होय ती आपल्याच जवळ आहे.तिलाही पुढच्या भागात समजून घेऊया.
रामकृष्णहरी