शिरूर : पुणे जिल्हात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे जिल्हा बँकेच्या ‘अ’वर्ग सोसायटी गटातील उमेदवार शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आबासाहेब गव्हाणे यांचा 109 मतांनी पराभव करीत सनसनाटी विजयाची नोंद केली आहे. श्री. गव्हाणे यांना अवघी 21 मते मिळाली. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा पराभव करीत जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत प्रथमच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पाडाव करीत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केल्याचा इतिहास घडला आहे.
आमदार अशोक पवार विरूद्ध आबासाहेब गव्हाणे या ‘अ’ वर्ग गटातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी पक्षाने जवळपास ८० उमेदवारांना सहलीला रवाना केले होते. दुसरीकडे निवडणुकीच्या दिवशी भाजपाची सर्व प्रमुख नेते मंडळी मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते. दोन्ही बाजूने विजयाचा दावा दावा करण्यात येत होता. प्रत्यक्षात ही लढत एकतर्फीच झाली.
तर हवेलीतून क वर्ग मधून भाजपचे उमेदवार प्रदिप कंद ४०५ तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली आहे.प्रदिप कंद यांनी घुलेंचा मतांनी पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे.
जिल्हा बँकेच्या ‘क’ वर्गातून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हात या जागेसाठी चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीने कंद यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हवेली तालुक्यातूनच सहकारात दिग्गज नेते सुरेश घुलेंना मैदानात उतरवून त्यांचे आव्हान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या लढतीची दखल राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारात प्रदिप कंद यांच्यावर शेलक्या भाषेत टिकास्त्र सोडून प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे कडक शब्दांत सुनावले होते.परंतु मतदारांनी प्रदिप कंद यांच्या पाठीमागे ठामपणे राहत दणदणीत मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे या निकालाने जिल्हात राष्ट्रवादीच्या सहकारातील वर्चस्वाची पाळेमुळे उघडी पडली आहे.विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामतीत प्रदीप कंद यांना निर्णायक ५२ मते पडली आहेत.