गीतार्थ श्रवण करणे म्हणजे सर्व दुःखांवर विजय मिळवणे आहे !
रोग्याने कडुलिंब न खाता दुधसाखर खाऊन बरे होण्यासारखे आहे.
आपल्याकडे ऐकवणारांची कमी नाही कमी आहे ती ऐकणारांची.ऐकण्याची क्षमता जोपर्यंत आहे तोपर्यंत सुधारणा शक्य आहे त्याचबरोबर यथायोग्य ज्ञानापर्यंत जाणं शक्य आहे.आवडीचे पदार्थ खाऊन आजार बरा झाला तर काय आनंद असेल?तसं गीतेचं तत्वज्ञान यातायात न करता आनंदी करणारं आहे.
माऊली हे भग्वद्गीताज्ञान प्राकृत भाषेत सांगताना म्हणतात,
आधीच साखर प्रिय आणि तिच जर औषध म्हणून घ्यावी लागली तर वारंवार तिसे सेवन का करु नये?मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद आणि सुगंधी आहे त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील,आपल्या गोडीन जिभेला नाचविल,त्याप्रमाणे कानांकडुन विहवग म्हणवील.तसं या कथेच्या श्रवणाने होणार आहे.एकतर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे आनायासे संसारदुःखाचे समुळ उच्चाटन होईल.जर मंत्रयोगानेच शत्रुस ठार मारता येईल तर कमरेला कट्यार बाळगणे व्यर्थ होणार नाही का?जर दुधाने,साखरेनेच रोग नाहिसा होणार असेल तर कडुनिंबाचा रस पिण्याचे कारणच काय?त्या प्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना दुःख न देता जर घरबसल्या नुसत्या ऐकण्याने मोक्ष मिळणार आहे.म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत.
आधींचि साखर आवडे।आणि तेचि जरी ओखदीं जोडे।तरी सेवावी ना कां कोडे।नावानावा।।सहजे मलयानिलु मंद सुगंधु।तया अमृताचा होय स्वादु।आणि तेथेंचि जोडे नादु।जरी दैवगत्या।।तरी स्पर्शें सर्वांग निववी।स्वादे जिव्हेतें नाचवी।तेवींचि कानाकरवीं।म्हणवी बापु माझा।।तैसे कथेचें इये ऐकणें।एक श्रवणासि होय पारणें।आणि संसारदुःख मूळवणें।विकृतीविणें।।जरी मंत्रेची वैरी मरे।तरी वायांचि कां बांधावीं कटारें।रोग जाय दुधें साखरे।तरी निंब कां पियावा।।तैसा मनाचा मारु न करितां।आणि इंद्रियां दुःख न देतां।एथ मोक्ष असे आयता।श्रवणाचिमाजी।।म्हणोनि आथिलीया आराणुका।गीतार्थु हा निका।ज्ञानदेवो म्हणे आइका।निवृत्तीदासु।।४/२२५ ज्ञानसन्यासयोग
सज्जनहो आम्ही जिज्ञासेपोटी का होईना पण हे अनमोल ज्ञान एकदा तरी संपूर्ण श्रवण केले पाहिजे. त्यामुळे निश्चित दुःखांची निवृत्ती होणार आहे. आणि खऱ्या सुखाचा शोध लागणार आहे.
रामकृष्णहरी