Take a fresh look at your lifestyle.

माझी बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी !

शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांची विशेष मुलाखत.

पारनेर : समाजकारण, राजकारण करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपण सामाजिक बांधिलकी जपल्याचे पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहोकले यांनी सांगितले.
श्री.रोहोकले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारनेर दर्शन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रोहोकले यांनी आपल्या सामाजिक तसेच राजकिय कामगिरीचा  आढावा घेतला. ते म्हणाले, सुरूवातीपासून जनतेसोबत संपर्क असल्याने पहिल्याच पंचायत समितीच्या निवडणूकीत आपणास मतदारांनी संधी दिली. या संधीचे सोनेे करून गणामध्ये विविध विकास कामे मार्गी लावली. वैयक्तीक लाभाच्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळवून दिला.
जामगांव घाट ते लोणीहवेली रस्ता, सारोळा अडवाई ते जामगांव रस्ता, नगर कल्याण महामार्ग ते १० वा मैल या रस्त्यांची कामे माजी आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लावली. जिल्हा परिषदेच्या कृषी व  बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध योजना ढवळपूरी गटामध्ये मार्गी लावल्या. अर्थ समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या माध्यमातून भाळवणी येथील शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध केला. या खोल्या जीर्ण झाल्यामुळे मोडकळीस आल्या होत्या.

माजी आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून ढवळपूरी जिल्हा परिषद गटामधील विविध गावांमध्ये बंधारे, कोल्हापूर पध्दतीने बंधारे, सभा मंडप, रस्ते आदी अनेक कामे मार्गी लावण्यात यश आले. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली. एक आदर्श गाव निर्मिती करण्यात यश आले. बाजार तळवरील ओटे, बाजार तळाचे काँक्रीटीकरण, स्मशानभुमीचे नुतनीकरण, जलसंधारणाची कामे या योजनेतून मार्गी लावण्यात आली. आदर्शगाव योजनेच्या धर्तीवर ढवळपूरी जिल्हा परीषद गटातील १० गावे दत्तक घेण्यात येऊन विविध विकास कामे मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परीषदेची निवडणूक ढवळपूरी गटातून लढविण्याचा मनोेदय व्यक्त करताना आपल्या उमेदवारीसाठी गटातील मतदारांचा पाठींबा असल्याचा दावा रोहोकले यांनी केला. सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क, मोठा जनसंपर्क, दुर्गम भागातील जनतेशी जपलेली बांधिलकी या जोरावर आपण या निवडणूकीत उतरणार आहोत. जनतेचाही तसा आग्रह आहे. मागील निवडणूकीत मातोश्री, भाळवणीच्या विद्यमान सरपंच लिलाबाई रोहोकले यांचा निसटता पराभव झाला होता. या पराभवाचे मतदारांना शल्य आहे. या पराभवाची सल दुर करण्यासाठी मतदारांनीच पुढाकार घेतला असून आपली निवडणूक लढविण्यावर आपण ठाम असल्याचे रोहोकले यांनी सांगितले.

आगामी काळातही जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगत रस्ते,पिण्याचे पाणी, शैक्षणिक सुविधा, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी व्यायामशाळा, अभ्यासिका, शेतकरी बांधवांसाठी कृषी मार्गदर्शिका, विविध शासकिय अनुदानाच्या योजना, आदिवासी व मागासवर्गीयांसाठीच्या योजना राबविण्यावर आपण भर देणार असून ढवळपूरी जिल्हा परिषद गट ‘मॉडेल’ करणार असल्याचा ठाम विश्वास श्री.रोहोकले यांनी व्यक्त केला.