Take a fresh look at your lifestyle.

द्रोपदीचा आपल्याशी संबंध काय ?

आपण अजूनही द्रोपदीला बाहेर शोधत आहोत ?

पंचतत्वांना चालवणारं मन आणि त्याची चालणारी मनमानी मनुष्याला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. मनावर अधिराज्य गाजवता येणं म्हणजे महायुद्धात विजय मिळवणे आहे.
द्रोपदीने राजगृहात दुर्योधनाची झालेली फसगत पाहिली आणि म्हणाली,आंधळ्याचं पोरगं आंधळच.या एका शब्दाने महाभारत घडलं.सर्वांची आहुती या अग्निकुंडात पडली.युद्ध जिंकुनही पांडव आनंदाने राज्य करु शकले नाहीत.द्रोपदीला कुणीही का समजावलं नाही.दिराशी केलेलं हे असभ्य वर्तन का कुणीच गांभीर्याने घेतलं नाही. मर्यादा भंग झाली की मोठमोठी संकटं पुढे ठाकतात.

एका शब्दानं द्रोपदीवर वस्रहरणाचा प्रसंग बेतला.पाचही शुर होते पण का कुणीच मदतीला आलं नाही?शेवटी भगवंताचा धावा केल्याने तिचे लज्जारक्षण झाले.सज्जनहो आपण अजुनही द्रोपदीला बाहेर शोधत आहोत?जेंव्हा हिच आपली द्रोपदी आहे. पाच तत्व हे तिचे पती आहेत पण पाचांनाही तिच्या शिवाय पुरुषार्थ गाजवता येत नाही हे खरे आहे.पण ती घसरली तर त्याचा परिणाम पाचांनाही भोगावा लागतो. पुरुषार्थाची पायमल्ली झाली की मग त्या बोलण्याला वजन रहात नाही. ते बरळणं ठरतं,वल्गना ठरतात आणि ते बरळणं नव्या संकटांची नांदी ठरते.लक्षात ठेवा ठेवणीलते शब्द,नेमकं खोचक बोलणं,घालुनपाडुन बोलणं,शब्दानं घायाळ करण्याची कला आपल्याला अवगत असेल तर निश्चितच समजा आपल्या माणसांशीच युद्ध प्रसंग येणार.पण पश्चाताप तुम्हाला भगवंताशी जोडेल.

आपल्या मनाचं सारथ्य भगवंताच्या हाती दिले की आनंद आहे. शब्दछळ करु नका.मनाला झालेल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. त्यानेच दुर्योधनाचं प्रगटीकरण आमच्यात होत असतं.मग सगळं गेलं तरी बदल्याची भावना मरत नाही. जीवनाचा द्युत म्हणजे जुगार होणार नाही याकडे सतत लक्ष दिले पाहिजे. कटकारस्थाने निर्माण करण्याची इच्छा म्हणजे शकुनीमामा आहे.तुम्ही खूप ज्ञानी,पवित्र आहात,परोपकरी आहात पण समोर वाईट घडतय हे पाहुनही तुमचं रक्त उसळ्या मारीत नसेल तर आपल्याच रक्ताच्या नात्याने मारलेल्या हजारो बाणांनी शरपंजरी पडावं लागेल.असा पितामह होणं कुणाला आवडेल?

चला द्रोपदीवर संस्कार करुया.चांगलं सात्विक बोलुया.नामस्मरणाची सवय तिला भगवंताशी जोडून ठेविल.मग अभद्र वाणी मुखातून येणारच नाही. याचसाठी संत म्हणतात, बोला तर हरि बोला नाही तर अबोला.
रामकृष्णहरी