Take a fresh look at your lifestyle.

खासदार डॉ.सुजय विखे पाटलांनाही कोरोनाची बाधा !

स्वत : ट्विट करीत दिली माहिती.

अहमदनगर : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दुप्पटीने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन झाले, त्यात काही नेत्यांसह अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातच अहमदनगर (दक्षिण)चे भाजपाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुजय विखे पाटील यांनीच स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. याआधी माजी मंत्री तथा भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
खासदार डॉ.सुजय विखे यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोव्हिड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
काही दिवसांपूर्वीच राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनातही कोरोनाने मोठा शिरकाव केला. राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार कोरोनाबाधित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.