Take a fresh look at your lifestyle.

अंतर्मनात चाललेली खळबळ थांबणार कशी ?

मन आणि आयुष्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.

एकदा का मनाने कच खाल्ली की मग शरीर कितीही पिळदार असुद्या, त्याचं जगणं संकटात आलच म्हणून समजा.मन हेच प्रमुख आहे. यावर आपण वेळोवेळी चिंतन केले आहे. मनाला स्थिरता मिळणं अशक्यप्राय वाटतं ना?हे सहज होणार नाही.याची सर्वांना कल्पना आहे. आपल्या प्रत्येकाचा हाच अनुभव असेल की ध्यानाला बसण्याचा प्रयत्न केला असता ते अधिकच पळापळ करतं.वास्तविक ध्यान ही क्रिया मनाला स्थिर करण्यासाठी आहे. पण ती क्रिया मन चंचल करण्याचं काम करतं असाच अनुभव येतो.मग सहज ध्यानातुन आत्मोन्नती साधायची कशी?हा प्रश्न आ वासुन उभा रहातोच.
सज्जनहो आत्मोन्नती हा शब्द स्वस्थैर्याशी निगडित आहे. तसाच तो स्वप्रगतीशीही निगडित आहे.मनाला शांत बसण्याची सवयच आपल्या इच्छित सत्कर्माला गती देते.अध्यात्मिक प्रक्रियेतलं नामध्यान मी येथे सांगणार नाही. कारण ते गुरुकृपेशिवाय शक्य नाही. प्रत्येकाला प्रापंचिक शुद्धता,सहजता यावी यासाठी हे ध्यान आहे.आपण यावर मागे चिंतन केले आहे.
पहाटेची वेळ यासाठी सर्वोत्तम आहे. बाहेरची शांतता महत्वाची आहे. शक्य असेल त्यांनी बंद खोलीत बसावे.सुखासनात बसावे पण पाठीचा मनका ताठ ठेवावा.डोळे मिटा आणि श्वासांवर आपलं लक्ष केंद्रित करा.आता अनेक विचारांची गर्दी सुरू होईल. पण ट्राफिकमध्ये जसं आपण दुसऱ्या गाड्यांना धडक न मारता पुढे जातो तसं आलेले कुविचार बाजूला सारुन पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्षात ठेवा या क्रियेने आत्मस्थिती कधीही प्राप्त होणार नाही.
आत्मोन्नती निश्चित होणार आहे.नको असलेले विचार बायपास करण्याची ही क्रिया आहे.अविचारांचा गठ्ठा जसा कमी होत जाईल तसं मन मोकळं होत जाईल. सुरुवातीला पंधरा मिनिटे ध्यान सराव करा.हळूहळू ही वेळ वाढवता येईल.
रामकृष्णहरी