Take a fresh look at your lifestyle.

सरत्या वर्षाला निरोप देतानी, मनी दाटतात आठवणी !

"या" मुळे वर्ष ठरले वेदनादायी

✒️ देविदास आबूज
पारनेर : सन २०२१ या वर्षाचा दिवस आज आता थोड्याच वेळात मावळेल. उद्या पुन्हा नवीन वर्ष सुरु होईल. सरत्या वर्षाला निरोप देताना आठवणी मनात दाटून येतात. २०२१ या वर्षात आपण काय गमावलं काय कमावलं ? या वर्षाची कदाचित इतिहासात ही नोंद होईल कोरोनामुळे सर्वांसाठीच हे वर्ष अतिशय वेदना देणारे ठरले. कोणी वडील गमावले… कोणी आई गमावली… तर कोणी बायका- मुले… दिवस येतात जातात वर्षामागून वर्ष सरतात… आयुष्याचा काळ असा पाहता पाहता वाळूसारखा निसटून जातो, पण काळजात घर केलेली आठवण सारखी घरघर करतेय… अजूनही ओली जखम भळभळ करतेय… सगळ्यात अचंबित करणारी बाब म्हणजे हे असे वेदना देणारे वर्ष लवकर कसे सरत नाही हेच उमजत नाही ….बघता बघता आयुष्याची वर्ष मात्र अशी सरून जातील आणि वार्धक्य समोर उभे राहील असे वाटायला लागते.
दर वर्षी अनेक संकल्प केले जातात पण तडीस मात्र एकही जात नाही. मग आजच्या तारखेला वाटायला लागते हे पण वर्ष असेच निघून गेले. मनाच्या निर्धाराला ज्या वेळी ह्रदयाची जोड मिळते त्याच वेळी संकल्पाची होडी तीराला लागते.प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आणि सरत्या वर्षांचा निरोप घेताना जो आनंद ओसंडून वाहत असायचा तो मात्र यावेळी नक्कीच नाही.
आज ही लेखणी चालवताना लेखणीलाही कंप सुटलाय… अंगावर शहारे आलेत… प्रत्येकाच्या डोळ्यात काळजीच्या छटा आजही आहेत…

पुन्हा ओमायक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या अवताराने प्रत्येकाला भीतीने ग्रासलेय… नव्या वर्षाच्या स्वागताच्या आदल्याच दिवशी शासनाने पुन्हा नवे निर्बंध घातलेत…पण नवीन वर्ष सर्वांसाठी चांगले काहीतरी घेऊन येईल प्रत्येकाच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण करेल… आम्हाला खात्री आहे पुन्हा सर्व काही पूर्ववत होईल.थोड्याच वेळात उन्हाचा खेळ संपू लागेल…. दिवस मावळतीला जाईल… केशरी रंगानी आभाळ भरून येईल… सकाळपासून सुरु झालेला दिवस असा रंगांची उधळण करत करेल…. आणि बघता बघता ढगाआड निघून जाईन… नव्याची सुरुवात करण्यासाठी …!
माणसाच्या आणि या उन्हाच्या खेळात मला नेहमीच साम्य वाटते.असो,या वर्षाचे काही तास क्षण आपल्याजवळ आहेत. थोड्याच वेळेत ढगाआड जाणारा सूर्य कदाचित उद्या असेलही पण हातातून निसटून जात असलेला क्षण उद्या मात्र नक्कीच नसेल…उद्या नवा दिवस उगवेल …आयुष्यातील नव्या वर्षाचे स्वागत करूयात…. नवी आशा … नवी दिशा… नवी उमेद घेत पुन्हा नव्या वर्षाला सामोरे जावूया …
जीवनातील अनेक गोष्टींचा साक्षीदार जाणारा काळ असतो. आपण आयुष्यात अशाच गोष्टी करू यात कि जीवनाच्या संध्याकाळी आपल्याला त्या हव्या हव्याशा वाटतील. आपल्या आयुष्यात सकारात्मक आनंददायी बदल घडवण्यासाठी आपणच तयार राहू …. गेल्या वर्षी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती या वर्षी होऊ नये हाच संकल्प करू. गानसम्राज्ञी लता दिदी म्हणतात, त्याच प्रमाणे ‘भले बुरे जे घडून गेले विसरुन जावू सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर’ …या आशेसह आपले प्रेम आणि स्नेह कायम राहो वृद्धिंगत होवो याच ‘पारनेर दर्शन’ कडून शुभेच्छा…!