Take a fresh look at your lifestyle.

“एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे ?”

अजितदादांचा चढला पारा !

 

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्षपदाचा पदभार विद्याधर अनास्कर यांनी स्विकारला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सहकारामुळे राज्यात बदल आणि विकासदेखील झाला आहे. पण याच सहकाराला नावदेखील ठेवण्याचे काम केले गेले आहे. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे असे होत नसल्याचे अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ईडीमार्फत कारखान्याच्या चौकशी झाल्या आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, “माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल हायकोर्टात केस दाखल अशी बातमी पाहण्यास मिळाली. काही संबंध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहेत. मागेदेखील दोन तीन बातम्या अशाच आणल्या गेल्या.यामुळे लोकांमधील मीडिया बद्दल विश्वास उडत चालला आहे”.

तुम्ही त्याविरोधात कायदेशीर मार्गाने जाणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. कुठे कायदेशीर कारवाईसाठी मागे लागता. वकील द्या, त्यांच्या मागे जा एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?”.

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यावर अजित पवार म्हणाले की, “केंद्राकडून सांगण्यात आले होते की, केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असल्याने काळजी घ्या. मात्र दुर्देवाने आपल्या राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये कोरोना आजाराची भीतीच राहिलेली नाही. कुठेही नियम पाळले जात नाही. आता सर्व संपलं आहे असा काही लोकांमध्ये गोड गैरसमज झाला आहे. त्यामुळे तिथे संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आव्हान करतात. मात्र त्यातून काही जण राजकारण करतात. काही जण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही आहे ते कुठं तरी थांबलं पाहिजे. पुन्हा तिसरी लाट आल्यावर येरे माझ्या मागल्या करून सगळच बंद करण्याची वेळ राज्यावर आणू नये एवढीच विनंती आहे”.

“शाळा सुरू करण्याबाबत सध्या दोन मतप्रवाह पाहण्यास मिळत आहेत. त्यामध्ये काही जण म्हणतात दिवाळीनंतर, तर दुसर्‍या बाजूला काही जण म्हणतात जिथे शून्य टक्के रुग्णसंख्या आहे तिथे शाळा सुरू करण्यात याव्यात. तसंच राज्यातील शाळा केव्हा सुरू करायच्या याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

भाजपापाठोपाठ आता मनसेदेखील मंदिरं दर्शनासाठी खुली करावी यासाठी आंदोलन करत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, “आक्रमक कोणी व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकजण येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता स्वतःच अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करणार, स्वतःचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच मंदिर सुरू करा हा एक भावनिक मुद्दा आहे. यातून काही साध्य करता येऊ शकते का हा अजमावण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. हे निर्विवाद सत्य आहे”.

12 आमदार आणि राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “राज्यपालांना आम्ही मागील आठवड्यात भेटणार होतो. पण काही कामानिमित्त राज्यपाल दिल्लीला गेले होते. पण राज्यपाल यांच्यासोबत आमची भेट झालेली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांना आम्ही माहिती दिली आणि योग्य तो निर्णय घेतो असे त्यांनी सांगितले. मी मुंबईत पक्ष कार्यकालात बसलो होतो तेव्हा हेमंत टकले यांच नाव, शिवसेनेकडून यांचं नाव कमी करण्यात आलं आहे अशा बातम्या पाहण्यास मिळाल्या. अशा बातम्या सारख्या आल्या तर यामुळे जनतेचा विश्वास उडेल, या सर्व घटना लक्षात घेता जोवर संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत बोलणे उचित ठरणार नाही”.