Take a fresh look at your lifestyle.

पारनेरची माती संघर्ष करायला व जिंकायला शिकवते !

प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांचे मत.

पारनेर : महिलांचे सर्व बाजूंनी सर्वांगीण सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे सांगत ज्ञानाचे सामर्थ्यही मोठे आहे. हिच शिकवण पारनेरच्या मातीतून मिळते. ही माती संघर्ष करायला आणि जिंकायला शिकवते असे मत डॉ. गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले.
येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षांतर्गत प्रेरणा व जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.यावेळी त्या बोलत होत्या.
आठव्या व नवव्या शतकात मातृसत्ताक पद्धती होती. त्या सक्षमपणे जीवन जगत होत्या. चिमणी व कावळ्याची गोष्ट ही स्त्रीसत्ताक पद्धतीचं एक उदाहरण आहे. आर्य संस्कृती बरोबर पितृसत्ताक पद्धती आलेली आहे. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. अग्नीचा शोध लावला. मातृसत्ताक व पितृसत्ताक परिवर्तनाचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांनी चंगळवादी आणि भोगवादी विचारांचा प्रसार केलेला आहे. प्रसारमाध्यमांकडून आपण नेमकं काय घ्यायचं हे आपल्या मानसिकतेवर आहे. आजची प्रसारमाध्यमे जे दाखवतात त्यातील सकारात्मक बाजू आपण स्वीकारावी. प्रसारमाध्यमांवर दाखवलेल्या काल्पनिकतेचे अनुकरण न करता त्यातील वास्तविकता स्वीकारायला हवे असेही डॉ. कोकाटे म्हणाल्या.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांना सक्षम करण्याची मुहूर्तमेढ समाजसुधारकांनी रोवली. गांधींबरोबर आंदोलनातही महिलाच मोठ्या संख्येने सहभागी होत्या. लिंग भेदभाव विसरून समाजात वावरलो तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. स्त्री उपभोग्य नाही. हे जेव्हा सांगितलं जातं, हे नाकारलं जातं तेव्हा हिंसाचार वाढतो. नेहमीच पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळकटीसाठी स्त्री – चारित्र्याचे हनन केले जाते. समाजामध्ये वावरताना स्त्रीला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तेव्हाच तिची प्रतिमा उंचावली जाते. निर्णय क्षमता वाढवणे व आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. स्त्रियांचे सर्व बाजूंनी सर्वांगीण सक्षमीकरण होणे आवश्‍यक आहे.
ज्ञानाचे सामर्थ्य खरे आहे. ते आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. पारनेर ची माती संघर्ष करायला आणि जिंकायला शिकवते. जयंती पुण्यतिथी साजरी करणे एवढंच आपलं कर्तव्य नाही. तर त्यांची तत्व स्वीकारणही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलींनी नेहमी ठाम रहावं. आपल्या मनातील गोंधळ दूर ठेवावा. स्वतःच्या मनावर ताबा मिळवावा. स्वतःच्या अंगी नम्रता असावी. मग कोणीही आपल्याला नाकारू शकत नाही, थांबऊ शकत नसल्याचेही डॉ. कोकाटे यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर, उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ दिलीप ठुबे, नॅक समन्वयक प्रा. महेश आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, महिला सक्षमीकरण कक्ष समन्वयक डॉ. माया लहारे, प्रा. अशोक मोरे, डॉ. हरेश शेळके उपस्थित होते. तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. प्रांजली भराटे यांनी काम पाहिले.आभारप्रदर्शन प्रा. माधुरी तारडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा तनपुरे यांनी केले.