Take a fresh look at your lifestyle.

…अखेर कालीचरण महाराजाला पोलिसांकडून अटक !

धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल वापरले होते अपशब्द.

भोपाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीपुत्र कालीचरण महाराज याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराज याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली. 
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली होती. तिथे कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत.
कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे वाद पेटला होता. कालीचरण महाराज हा फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं.

त्यानंतर कालीचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.