Take a fresh look at your lifestyle.

पीएमआरडीएच्या आराखडयात सुधारणा करणार !

जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांची माहिती.

✒️ सतीश डोंगरे

शिरूर : शिरुर – न्हावरा जिल्हा परिषद गटातील ज्या ज्या गावांमध्ये पीएमआरडीए च्या आराखड्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यात सुधारणा करण्यासाठी काही सूचना व त्यांवर अंमलबजावणीसाठी योग्य ते उपाय योजना करण्याची आग्रही मागणी आपण केली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांनी दिली. 

पीएमआरडीए च्या प्रादेशिक नियोजन आराखड्यासंदर्भात तालुक्यातील अनेक नागरिकांच्या हरकती व अडचणी निवारण करण्यासाठी व त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस शिरूरच्या वतीने जेष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड यांच्या उपस्थितीत वाघोली येथे माहितीपर शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात आपण अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे श्री. जगदाळे पाटील यांनी सांगितले. 

नवीन नकाशात नदीकाठच्या गावांच्या पूररेषा या गावठाणाच्या आतमध्ये मार्किंग केलेली दिसत आहे, त्यात सुधारणा करण्यात यावी व ती पुररेषा गावठाण हद्दीबाहेर मार्किंग करण्यात यावी तसेच नवीन होणाऱ्या इंडस्ट्रीयल झोनसाठी अगोदरच जमीन अधिग्रहण झालेलं असताना, या नवीन नकाशात सरदवाडी कारेगाव आदी गावांच्या गावठाणमध्ये सुद्धा इंडस्ट्रीयल झोन दाखवला गेला आहे तो हटवण्यात यावा.

लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक गावात गावठाण सोडून सेपरेट R झोन प्लॅन करायला हवा होता, परंतु या नवीन नकाशात जवळपास सगळ्याच गावांमध्ये गावठाणाच्या हद्दीबाहेर बिलकुल R झोन दाखवला नाहीय, त्यात सुधारणा करण्यात यावी.

करडे व सरदवाडीसारख्या गावांची अनेक हेक्टर जमीन ही जर इंडस्ट्रीयल झोनसाठी आरक्षित झालेली आहे तर या गावांना कमीत कमी 1 ते 2 किमी R झोन प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात यावा.या नकाशात माझ्या जिल्हा परिषद गटातील अनेक गावांना रिंगरोड दाखवण्यात आला आहे, ज्या गावांना चहुबाजूंनी 8 ते 10 रोड येऊन मिळत असतील तर त्या गावांना रिंगरोडची काहीच आवश्यकता नसते, सरसकट सगळ्याच गावांना रिंगरोड प्रस्तावित करू नये.

कोविड 19 काळात राज्यशासनाच्या नियमानुसार कुठेही ग्रामसभा झाल्या नाहीत, त्यामुळं गावकऱ्यांमध्ये या PMRDA नकाशाबाबत अनेक संभ्रम असूनही ते निवारण करण्यासाठी ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत.

नवीन नकाशाबाबतच्या माझ्या जिल्हा परिषद गटांतील व तालुक्यातील जनतेच्या मनात असलेल्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी, ज्या ज्या गावांमध्ये ग्रामस्थांना अडचणी येत आहेत, तिथल्या सर्वपक्षीय सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात यावं, तसेच या सर्व अडचणी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या मार्गाने सोडवण्यात याव्यात अशी आग्रही भूमिका आपण या शिबिरात मांडली, असे राजेंद्र जगदाळे पाटील यांनी सांगितले.