Take a fresh look at your lifestyle.

कारेगावच्या ‘चहा पॉईंट’ चौकात साकारणार सुसज्ज बसस्थानक !

पीएमपीएमएलने दिली प्रस्तावास मंजूरी.

शिरूर : कारेगाव ग्रामपंचायत आणि पीएमपीएमएलच्या सहकार्याने कारेगाव येथील मराठी शाळेजवळील ‘चहा पॉईंट’ चौकात पीएमपीएमएलचे सुसज्ज बसस्थानक साकारणार आहे. 
कारेगाव ग्रामपंचायतीच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना या बसस्थानकाचा थ्रीडी आराखडा सादर केला. श्री. मिश्रा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ मंजुरी दिली.
पुणे- नगर रस्त्यालगत मराठी शाळेजवळील चौकात सध्या पीएमपीएमएलची बस वापरत असलेली जागा अपुरी आहे. तसेच आता शाळा चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे ये – जा व स्थानिक रहिवाशांची वर्दळ यामुळे बसला अडथळा निर्माण होत होता. शिवाय अपघाताचा ही धोका होता. ही गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने मराठी शाळेजवळच्या संरक्षक भिंती लगतची मोठी जागा बस स्थानका साठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी या ठिकाणी असणारी विद्युत डीपी व विद्युत खांब ही हटविण्यात आले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार या बसस्थानकाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये बसस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, बसचे वेळापत्रक फलक, कंट्रोलर केबीन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, गार्डन, परिसराचे सुशोभीकरण आणि बस वापरासाठी प्रशस्त जागा असे नियोजन करण्यात आले आहे.
या जागेबाबत ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत तसेच थ्रीडी आराखडा नुकताच पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सादर करण्यात आला. मिश्रा यांनी तातडीने याची दखल घेऊन सहाय्यक अभियंता दत्तात्रय तुळपुळे यांना लवकरात लवकर टेंडर काढून काम करण्याची सूचना केली.
या बसस्थानकासाठी सरपंच निर्मलाताई नवले, उपसरपंच संदीप नवले, माजी उपसरपंच अजित कोहोकडे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आता हे सर्व सुविधांनी सुसज्ज असे बस स्थानक लवकरच आकार घेणार आहे. शिवाय त्यामुळे गावच्या वैभवातही भर पडणार असून हे पीएमपीएमएलनचे बस स्थानक ग्रामीण भागातील पहिले सुसज्ज बसस्थानक ठरणार आहे.