Take a fresh look at your lifestyle.

…अन् शरद पवारांचा ताफा थांबला !

'त्या' शेतकरी परिवाराला बसला सुखद धक्का.

शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्याचाच प्रत्यय आज शिरूर तालुक्यातील खैरेनगर येथील एका शेतकऱ्याला आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आज शिरूर तालुक्यात आले होते. मात्र वाटेत खैरेनगर जवळ एका शेतकऱ्याने त्यांना हात केला आणि चक्क संपूर्ण शरद पवार साहेबांच्या गाड्यांचा ताफा त्यांची विचारपूस करण्यासाठी थांबला. त्यामुळे या शेतकऱ्याला ही सुखद धक्का बसला.

खेडचे माजी आमदार स्व.साहेबराव सातकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून श्री.पवार टाकळी हाजी येथे पोपटराव गावडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. मात्र वाटेत खैरेनगर येथे माजी सरपंच रघुनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय पवार साहेब येणार म्हणून रस्त्यात दोन तासापासून वाट पाहत थांबले होते.

अखेर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाड्यांचा ताफा शिंदे यांच्या घराजवळ येताच रस्त्यावर शिंदे यांनी त्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला.
त्याबरोबर श्री पवार यांनी गाडी थांबण्याची विनंती केली आणि संपूर्ण ताफा रस्त्यावर थांबला. त्यानंतर शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत यांनी ‘साहेब कांद्याचे तेवढे बघा’ अशी विनंती केली.

त्याबरोबर श्री पवार यांनी स्मितहास्य करीत मान हलवली आणि त्यानंतर दिसणाऱ्या द्राक्ष बागेकडे हात दाखवत द्राक्ष बागेचे काय आहे? असा प्रश्न केला त्यावर चंद्रकांत यांनी द्राक्ष बागेचे अवकाळी पावसाने बरेच नुकसान झाले, अशी माहीती दिली. अशा प्रकारे संभाषण झाल्यानंतर श्री. पवार यांच्या गाड्यांचा ताफा कान्हूर मेसाई मार्गे टाकळीहाजी कडे रवाना झाला. त्यानंतर पवार साहेब खैरेनगर येथे थांबल्याची एकच चर्चा संपूर्ण परिसरामध्ये रंगली.