Take a fresh look at your lifestyle.

कर्माच्या ठिकाणी अकर्म पहाता यायला हवे !

त्यामुळे फलासक्ती निर्माण होत नाही.

 

 

आनंदावर विरजन टाकणाऱ्या गोष्टी पैकी एक फार त्रास देणारी गोष्ट तुम्हा आम्हाला सर्वांना चिकटली आहे ती म्हणजे कर्म करतानाची फलासक्ती.मी अमुक काम केले आहे आणि त्याचे फळ मला चांगलेच मिळाले पाहिजे हा मानसिक प्रपोगंडा स्वास्थ्य लाभु देत नाही. चुकीचे कर्म केल्याने त्याचं फळ हे वाईट मिळेल याचा विचार मात्र मनात कधीच डोकावत नाही. मुळात कर्म करुन तटस्थ होता आले पाहिजे. शिवाय केलेले कर्म उत्तम असले पाहिजे. त्याशिवाय या विचारापर्यंत येता येत नाही.

फळ मिळायचे तेच मिळणार आहे.त्याची आसक्ती किंवा अपेक्षा धरणं,चिंता करणं याला नंतर काहिच मुल्य रहात नाही. माऊलींनी यावर अत्यंत सुंदर सविज्ञान दाखला दिला आहे. ते म्हणतात,

आणि उदो अस्तुचेनि प्रमाणें।जैसें न चालतां सुर्याचें चालणें।तैसें नैष्कर्मत्व जाणें। कर्मींची असतां।।तो मनुष्यासारिखा जरी आवडे।परी मनुष्यत्व तया न घडे।जैसें जळामाजी न बुडे।भानुबिंब।।तेणें न पहातां विश्व देखिलें।न करिता सर्व केलें।न भोगिंता भोगिलें।भोग्यजात।।एकेचि ठायीं बैसला।परि सर्वत्र तोचि गेला।हें असो विश्व जाहला।आंगेचिं तो।। ४/१०२कर्मसंन्यास

सुर्य उदय आणि अस्त पावतो या एकाच प्रमाणावरुन तो फिरतो आहे. चालत आहे असे वाटते पण वास्तविक तो स्थिर आहे.किंवा सुर्यांचे प्रतिबिंब पाण्यात दिसते पण तो प्रत्यक्ष पाण्यात बुडालेला नसतो.तद्वत जो कर्माच्या ठिकाणी अकर्म आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पहातो असा मनुष्य कर्म करताना भासतो पण तो नैष्कर्मत्वाने जीवन जगत असतो.

तो बुद्धिमान योगी आहे.असं जीवन जगणारघ माणसं आपल्या आसपास असतातच फक्त ती ओळखण्याची दिव्यदृष्टी आपणाकडे असायल हवी.प्रापंचिकाला विकार लगेच धरतात म्हणजे अगदी परोपकाराने वागणारा मनुष्य सुद्धा प्रापंचिक हानी होताना पाहिले की कृद्ध होण्याची शक्यता बळावते.त्याचा संयम ढळण्याची शक्यता असते.

माऊलींनी जो चळत नाही ढळत नाही नैष्कर्म भावाने कर्म करतो त्याला बुद्धिमान आणि योगी संबोधले आहे.

रामकृष्णहरी