Take a fresh look at your lifestyle.

रंगलेल्या गालाचे मुके घेण्यावरुन राष्ट्रवादी-भाजपात रंगला शाब्दिक वाद !

प्रवीण दरेकरांवर रूपाली चाकणकरांचा हल्लाबोल !

 

 

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. लावणी सम्राज्ञी तसेच आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली.

“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.