Take a fresh look at your lifestyle.

“पाटील थाळी संपवा अन् 50 हजाराचे बक्षीस मिळवा !”

शिरूरमधील व्यावसायिकाचा नवा फंडा !

✒️ सतीश डोंगरे
शिरूर : ‘ पाटील थाळी संपवा अन् 50 हजार बक्षीस मिळवा ‘ ऐकून आश्चर्यचकित झालात ना? पण ही स्किम कुठे पुण्या-मुंबई सारख्या शहरातील नाही तर चक्क आपल्या शिरूर शहरातील आहे. या हाॅटेलच्या अशा मार्केट फंडाची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अशोक वाळुंज आणि विजय कोठावळे या दोन मित्रांनी शिरूर बायपासजवळ हॉटेल वाडा या नावाने हाॅटेल चालू केले आहे. नुकतेच दिमाखदार सोहळ्यात पारनेरचे आमदार निलेश लंके व त्यांच्या सुविद्य पत्नी जि.प.सदस्या राणीताई लंके यांच्या शुभहस्ते या हाॅटेलचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून उल्हास कामठे हे सेलिब्रिटी सर्वांचे आकर्षण ठरले. या कार्यक्रमात पाटील थाळी संपवा अन् 50 हजार बक्षीस मिळवा… याचीच सर्वाधिक चर्चा रंगली. यावेळी श्री. कामठे यांनी ही थाळी संपविण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला.
चिकन, मटन, भाकरी, अंडी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुके मटन, मटन मसाला, चिकन फ्राय, सूप आणखी बरेच काही असलेली ही महाकाय थाळी तशी एकावेळेस 3 ते 4 माणसे खाऊ शकतात. पण ही थाळी एकट्या माणसाने संपविल्यास 50 हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तशी जाहिरात हाॅटेल परिसरात लावण्यात आली आहे. त्यामुळे कुतूहलाने लोकांच्या नजरा या हाॅटेल कडे वळत आहेत.
थाळी संपविणारा पठ्ठया अद्याप तरी या हाॅटेलला भेटला नसला तरी आगामी काळात अशी थाळी संपवून 50 हजारांच्या बक्षिसाचा मानकरी कोण ठरतंय ? याबाबत हाॅटेल प्रशासनासह सर्वांनाच उत्सुकता आहे.