Take a fresh look at your lifestyle.

पुण्यनगरीत साकारणार शिरूर मित्रपरिवार !

एकमेकांचे सुख दुःख जाणून घेण्यासाठी निर्णय.

शिरूर : एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे, उद्योग व्यवसायात अडचणीत एकमेकांची मदत व्हावी व सर्वांची प्रगती व्हावी, या हेतूने पुण्यात राहणाऱ्या शिरूरच्या रहिवाशांसाठी ‘शिरूर तालुका मित्र परिवारा’ची स्थापना करण्यात आली असून याबाबतची एक बैठक येत्या 25 डिसेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. केंदुरचे बाळा पऱ्हाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील अनेकजण पुण्यात स्थायिक आहेत. मात्र ते सर्व जण सध्या विखुरलेले आहेत. सर्वांनी संघटित व्हावे, सर्वांना एका छताखाली आणून एकमेकांच्या सहकार्याने उद्योगधंद्यात व्यवसायात मदत व्हावी, ओळखीपाळखी व्हाव्यात. एवढ्याच हेतूने या शिरूर तालुका मित्र परिवाराची स्थापना करण्याची संकल्पना आहे, असे श्री.पऱ्हाड यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील अनेक जण सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत. तसेच कला-क्रीडा नाट्य, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. अशा सर्वांचा सन्मान करता यावा, हा या ‘शिरूर तालुका मित्र परिवार’ स्थापनेमागचा हेतू आहे.
पुण्यात हाॅटेल वैशाली द्वारका गार्डन कार्यालयासमोर येथे येत्या 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पुण्यात राहणाऱ्या शिरूर तालुक्यातील नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. पऱ्हाड यांनी केले आहे.