विविध कारणांच्या निमित्ताने किंवा श्रद्धा म्हणून आपण मंदिरामध्ये जात असतो. विशेषतः मंदिरात गेल्यावर मनातील भीती, दडपण नाहीसे होते. मात्र भारतामध्ये एक असे मंदिर आहे, जिथे जाण्याचे धाडस सर्वसामान्य माणूस करत नाही. या मंदिराची ख्यातीच अशी आहे, ज्यामुळे नकारात्मक शक्तीच काय, तर भाविक देखील दर्शनाला येण्याचे धाडस करत नाहीत.
हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतामध्ये भरमोर नामक लहानशा गावामध्ये असणाऱ्या मंदिराबद्दल आपण बोलत आहोत. हे मंदिर लहानसे असले, तरी याची ख्याती मात्र सर्वदूर आहे. या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात मात्र गाभाऱ्यामध्ये प्रवेश न करता, मंदिराच्या बाहेरूनच देवाचे दर्शन घेतात. हे मंदिर यमदेवाचे मंदिर आहे. यमदेवाला समर्पित मंदिरे भारतामध्ये फारशी नाहीत. भरमोर येथील या यम मंदिरामध्ये प्रवेश करण्याची मुभा केवळ यमदेवांनाच असल्याची मान्यता येथे रूढ असल्याने या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचे धाडस कोणी करीत नाहीत.
स्थानिक ग्रामस्थ म्हणतात की, या मंदिरामध्ये चित्रगुप्तासाठी देखील एक लहानसा कक्ष आहे. चित्रगुप्त जगातील सर्व मनुष्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. ही कर्म लक्षात घेता मनुष्याला मृत्युच्या नंतर स्वर्ग प्राप्त होणार की तो नरकात जाणार? हे ठरविण्याचा अधिकार चित्रगुप्ताला आहे, अशी ही समजूत आहे.
भरमोरमधील या यम मंदिरमध्ये चार दरवाजे असून. ते दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या चार धातूंनी बनविण्यात आले आहे. ज्या मनुष्याने आयुष्यभर वाईट कर्मे केली, त्यांच्या आत्म्याला मृत्युच्या पश्चात लोखंडी दरवाजातून परलोकात पाठविले जाते, तर ज्यांनी पुण्यकर्मे केली, त्यांचे आत्मे सोन्याच्या दरवाजातून परलोकामध्ये पाठविले जात असल्याची आख्यायिका या ठिकाणी प्रसिद्ध आहे.