शिरूर : राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, असा संकल्प विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला होता. या संकल्पपूर्ती निमित्त त्यांनी नुकतीच अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केली.
त्यानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. गोऱ्हे नुकत्याच रांजणगाव गणपती येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी महागणपतीचे दर्शन घेऊन अभिषेक केला व संपूर्ण देवस्थान परिसराची पाहणी केली.
महागणपती मंदिर परिसराचे सुशोभिकरण, विद्युत खांब बसविणे, उर्वरित रिंग रोडची कामे करणे, स्वच्छता ग्रहाचे बांधकाम करणे यासह इतर कामासाठी 35 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी श्रीमती गोऱ्हे यांनी दिली.
यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख संगीताताई शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विजयराज दरेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी आर वाय पाटील, देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक बाळासाहेब गोरे, व हिशोबनीस संतोष रणपिसे आदी उपस्थित होते. यावेळी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविक भक्तांनी श्रीमती गोऱ्हे यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत सेल्फी काढले.