Take a fresh look at your lifestyle.

रूम मालकांनो सावधान ! खोली भाडयाने देताय का ?

...पण अशी घ्यावी लागेल काळजी.

शिरूर : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसाधारण वर्षाला सरासरी पाचशे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात हेच प्रमाण दोनशे ते अडीचशे पर्यंत खाली आणण्यासाठी विविध उपाययोजना चालू आहेत, अशी माहिती रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.
रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोल्या भाड्याने देणाऱ्या घरमालकांची बैठक श्री. मांडगे यांनी बोलविली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहूल शिंदे हे ही बैठकीला उपस्थित होते.
श्री. मांडगे म्हणाले, रांजणगाव एमआयडीसी मध्ये वाढती रहदारी, कारखानदारी आणि परप्रांतीय कामगार तसेच अपु-या सुरक्षा व्यवस्था यामुळे दैनंदिन विविध प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. गुन्हे कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही नुकतीच अनेक कारखान्यांची व्हिजिट केली. यावेळी सुरक्षा विषयक अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले त्यानंतर कारखानदारांची बैठक घेऊन त्यांना याबाबत विविध उपाय योजना करण्याचे सुचीत केले तसेच मुख्य गेटवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची सूचना केली. काही कारखान्यांकडे सीसीटीव्ही यंत्रणा होती परंतु ती बंद पडलेल्या अवस्थेत होती तेही चालू करण्याची सूचना देण्यात आली आहे.
घर मालकांनी खोल्या भाड्याने देताना भाडेकरूंची सर्व सविस्तर माहिती एका विहित नमुन्यातील फॉर्मवर नोंदवून ठेवावी. त्यामध्ये भाडेकरुच्या गावाचे नाव मोबाईल नंबर तो काम करीत असलेल्या कंपनीचे नाव नातेवाईकांचे जवळचे नंबर इत्यादी माहिती व्यवस्थित भरलेली असावी. जास्त खोल्याअसणाऱ्या मालकांनी सीसीटीव्ही बसवावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घर भाडे मालकांनी भाडे करार करून घ्यावेत, असेही सुचविण्यात आले आहे. जे खोली मालक या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील अशी ताकीद ही यावेळी मांडगे यांनी दिली.
पत्रकार पोपटराव पाचंगे यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. मांडगे यांचे स्वागत केले व सर्व खोल्या मालक सूचनांचे तंतोतंत पालन करतील, अशी ग्वाही दिली.