Take a fresh look at your lifestyle.

संतसंगतीनेच संग टाकता येतो !

कलियुगात संत संगतीनेच तरता येईल.

संगत कुणाची केल्याने त्याचे परिणाम काय होतात,हे अनुभवास येतातच.चोराची संगत चोरी करायला भाग पाडते,दारुड्याची संगत दारुड्या करुनच सोडते.सज्जनाची संगत सज्जन करते,संतांची संगत मिळाली तर ते संत करुनच सोडतात.जसा संग तसा रंग हे अगदी खरं आहे.सहवास कुणाचा असावा हे समजले तर अनर्थ टळतात.संत ओळखता आले पाहिजे हे ही तितकेच महत्वाचे आहे.
संत नामदेव महाराज म्हणतात,
संतसंगतीचे काय सांगु सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥१॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलियुगीं ॥२॥
इहलोकीं तोचि सर्वांभूती सम । शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥
नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचं सुख किती श्रेष्ठ आहे म्हणून सांगावं!या कलियुगात तेच एक समभाव ठेवत असतात,त्यांच्या ठायी देहाकर्षण संपलेलं असतं.स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीराविषयीचा भ्रम त्यांचे ठायी नसतो.नामदेव महाराज म्हणतात,गाय दुध देते त्याचा स्वाद,चव सर्वांनाच सारखा लागतो.गाय दुध देताना कोणताही भेदाभेद करत नाही. तसाच साधुचा सहवास आहे.संतांचं वागणं तसं असतं.तेथे उच निच काही नाही.
सर्वांना समदृष्टीने पहाण्याची शक्ती साधुकडे असते त्यामुळे या कलियुगात साधु थोर आहे. त्याचा संग मिळाला की संग टाकण्याची शक्ती प्राप्त होते.संतसहवासात नको असलेला संग म्हणजे कुसंग त्यागुन सुसंग,सत्संग मिळवण्याची शक्ती आहे.आपण सतत तो सहवास मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचरणशुद्धीचा तो रामबाण पर्याय आहे.
रामकृष्णहरी