शिरूर : घोडनदीच्या काठावर शिरूरच्या बाजूने वसलेली दाणेवाडीसह गोपाळवाडी, टेमगिरे वस्ती, थेऊरकरवस्ती, जगताप वस्ती या वाड्या-वस्त्या सध्या श्रीगोंदा तालुक्यात आहेत. मात्र दळणवळणाच्या दृष्टीने त्यांची मोठीगैरसोय होत आहे त्यामुळे या वाड्या वस्त्यांना शिरूर तालुक्याला जोडण्यात यावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
आमच्या दाणेवाडी सह इतर सात वाड्या-वस्त्या सध्या श्रीगोंदा तालुक्यात आहेत नदी आडवी असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने आणि सरकारी कामकाजाच्या दृष्टीने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून या वस्त्या श्रीगोंदा तालुक्याऐवजी शिरूर तालुक्याला जोडण्यात याव्यात व आमची गैरसोय दूर करावी अशी आग्रही मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वीही आम्ही अनेक वेळा अशी मागणी केली आहे मात्र कोणीही आमच्या मागणीचा अद्यापही सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही. साधा सातबारा आणण्यासाठी सुद्धा मोठा वळसा घालून श्रीगोंदा तालुक्यात जावे लागते. कोर्टकचेरी, पंचायत समिती, तहसील कचेरी आदी विविध कामांसाठी श्रीगोंदा या तालुक्याच्या गावी जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतात. शिवाय आमच्या या गावांवर विकासकामांच्या बाबतीतही मोठा अन्याय होत आहे. साधे रस्त्याचे कामही अद्याप पर्यंत झालेले नाही तसेच विजेची ही मोठी अडचण आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात. पुढारी वाड्या वस्त्यावर लोकांचे उंबरे झिजवतात मात्र कोणीच आमच्या मागणीची दखल घेत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.