Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका थंडीने गारठला! 

दोन महिने हुडहुडी कायम राहणार! 

पारनेर : पारनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून गारठ्यामुळे हुडहुडी चांगलीच वाढली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शेतकरी उशिरा शेतात जात आहेत तर थंडीमुळे शेतीकामांसाठी मजूरही मिळेनासे झाले आहेत.
उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर पारनेरबरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील तापमान ८ ते ९ अंशांपर्यत खाली आले आहे. २१ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील तापमान १० अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर ८ ते ९ अंशांपर्यंत खाली आलं आहे. निघोज, सुपा, अळकुटी, पुणेवाडी, पानोली, भाळवणी या भागातील नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर अनेकांनी ऊबदार कपडेही वापरण्यास सुरूवात केली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे थंडीचे आगमन जरा उशिरा झाले. पण आता ही थंडी २१ फेब्रुवारी कायम राहणार आहे. त्यात आज आणि उद्या तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील ४८ तासात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान ८-९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.एकीकडे थंडीचा माहोल असताना दुसरीकडे पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले होते.