Take a fresh look at your lifestyle.

नगरपंचायत : बोगस मतदारांनो सावधान !

...नाही तर होणार गुन्हे दाखल !

पारनेर : शहरातील विविध प्रभागांमध्ये बोगस मतदारांविरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार महेश औटी यांनी तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे तक्रार केली होती.अशा बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसिलदार आवळकंठे यांनी सांगितले.
तहसिलदार आवळकंठे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तक्रारीची शहानिशा करण्यात येऊन तक्रारदार महेश औटी यांना लेखी पत्र देण्यात आले.अशा बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसिलदार आवळकंठे यांनी औटी यांना कळविले आहे.
पारनेर नगरपंचायतीसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी मतदान होत असून विविध प्रभागांतील मतदार यादीमध्ये काही लोकांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळी तसेच हितचिंतकांची बोगस नावे टाकून दुबार मतदार नोंदणी केली आहे. पारनेर शहरालगतच्या ग्रामपंचायतींमधील काही लोकांची नावे टाकून दुबार मतदान नोंदणी करण्यात आल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. असे बोगस मतदार लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून त्यांनी प्रशासनाची फसवणूक केलेली असल्याचे महेश औटी यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चेे कलम ३१ अन्वये जर कोणी व्यक्तीने मतदार यादी तयार करणे, सुधारणे किंवा दुरूस्त करणे अथवा मतदार यादीत कोणतीही नोंद समाविष्ट करणे किंवा मतदार यादीतून नाव वगळणे यासंदर्भातील जी गोष्ट खोटी असून ती खोटी असल्याचे तिला ज्ञात असेल किंवा तसे ती समजत असेल किंवा खरी असल्याचे  तो समजत नसेल त्या गोष्टीबाबत लेखी निवेदन किंवा अभिकथन केले तर तर ती व्यक्ती एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास, किंवा द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र होईल असे तहसिलदारांनी दिलेल्या लेखी पत्रात नमुद करण्यात आले आहे.
एखादी व्यक्ती दुबार मतदार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास चौकशीअंती सदर बाब सिध्द झाल्यास त्या व्यक्तीविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार आवळकंठे यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान तहसिलदारांच्या आदेशामुळे बोगस मतदारांचे धाबे दणाणले आहे.