Take a fresh look at your lifestyle.

सहनशीलता हा संतगुण आहे !

तो प्राप्त करणं म्हणजे संतच होणं आहे.

हल्ली तरुणांमध्ये सहनशीलता अभावानेच पहायला मिळते. तो तारुण्याचाच दोष आहे. संस्कारक्षम परिवारांत अजुनही बरी परिस्थिती आहे. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी सहन करणं सामान्य गोष्ट नाही.हे जमलं तर संतपदच प्राप्त झाले. माऊलींना जननिंदेचा मोठा सामना करावा लागला.जगणं असहाय्य व्हावं इतक व्यथित झालेल्या ज्ञानदेवांनी ताटीचं दार बंद करुन आत बसणं पसंत केलं.ज्ञानदेवांची ही स्थिती पाहुन मुक्ताई महाराजांनी ज्ञानदेवांना उपदेश करताना ताटीचे अभंग निर्माण झाले त्या म्हणतात,
संत जेणे व्हावे।जग बोलणे साहावे।।
तरीच अंगी थोरपण।जया नाही अभिमान।।
थोरपणं जेथे वसे।तेथे भुतदया असे।।
रागे भरावे कवणाशी।आपण ब्रम्ह सर्वेदेशी।।
ऐशी समदृष्टी करा।ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
संत होणं महाकठीण आहे. आपल्याला कुणी एक शब्द टाकुन बोललं तर आपण त्याचं तोंड पहात नाही.मुक्ताई महाराज म्हणतात,संत व्हायचय ना मग जगनिंदा सहन करण्याची शक्ती ठेवलीच पाहिजे.त्याशिवाय थोरपण येत नाही.आणि जेथे अभिमान सांडून थोरपण आहे तेथे भुतदया आपोआप येतेच.सर्वाभुता मी चि एक.सर्वांमधे मीच एक चैतन्य रुपाने विराजमान आहे असं भगवंत म्हणतात,या न्यायाने मी सुद्धा भगवंताचाच अंश आहे मग रागवावं तरी कुणाला?हा समदृष्टी भाव निर्माण करा,ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
सज्जनहो मुक्ताई महाराजांनी माऊलींचं निमित्त करुन हा संदेश जडजीवांना उद्धरण्यासाठी दिलेला आहे. आपल्याला संत होता आलं नाही तरी चालेल.पण हा विचार मनाशी घोळत राहिला तरी संथ होणं शक्य आहे.विषय थंडावले की मग संतपंथी आपोआप चालणं सुरू होतं.सध्या आपल्या जीवनात ग्रंथ हेच गुरु आहेत.
तेच आपल्याला खऱ्या संतांपर्यंत घेऊन जातील.अभंगप्रपंच त्यासाठी आहे. आपल्या मुलांना आपण हे शिकवले पाहिजे. पण त्याआधी आपण आचरणात आणले पाहिजे. मग संतत्व दुर नाही. मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमल़ तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी