Take a fresh look at your lifestyle.

बांगड्यांचे मोर …. जीवाला घोर !

कवी भरत दौंडकर यांनी शेअर केला बापूंचा 'तो' किस्सा !

 

शिरूर : ‘ बापू’ म्हणजेच ज्येष्ठ कवीवर्य विठ्ठल वाघ.त्यांची कविता आणि समग्र साहित्य मराठी भाषकांना सर्वश्रुत आहेच.पण पुस्तकांच्या पानाआड मस्त फकीरीत दडलेला अवलिया फार कमी जणांना माहीत आहे. त्या अवलीयाच्या बांगड्यांच्या मोराविषयीचा किस्सा आज बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील कवी भरत दौंडकर यांनी शेअर केला.

साधारण तीसेक वर्षांपूर्वीची घटना असेल. विठ्ठल वाघ हे उत्तम आणि वेगळी शैली असणारे चित्रकार आहेत.स्वतःच्या घरात त्यांनीच काढलेल्या चित्राकडे ते निराश होऊन पाहत बसले होते.अलीकडच्या काळात तैलचित्राचे रंग फार लवकर फिकट होतात.त्या मानाने अजिंठा लेण्यांमधील हजारो वर्षांपूर्वी काढलेल्या चित्रांचे रंग आजही चमकदार कसे?या काळात असले रंग न उडणारे रंग कुठे मिळतील?असला काथ्याकूट करत बसलेले बापू.असा मनाला घोर लावून घेतलेला.अशातच कार्यक्रमासाठी त्यांना त्या दिवशी एसटीने प्रवास करायचा योग आला.आणि त्या एस्टीतच सापडला बांगड्यांचा मोर.

एसटीत धुळीने माखलेल्या फुटलेल्या बांगड्यांच्या काचेवर पावसाचा शिडकावा झाला आणि बापू चमकले.भिजून चमकदार झालेल्या बांगड्या त्यांनी हातात घेतल्या. आणि त्यांना रंगांचा साक्षात्कार झाला.कधीही न उडणाऱ्या बांगड्यांच्या रंगाचा साक्षात्कार. त्यांनी ते पोपटी रंगांचे तुकडे घरी आणले.त्यांना भिंतीवर पानाच्या आकारात चिकटवले .त्यात हिरवा रंग भरला. ते इतके मोहक दिसू लागले की बापूंमधल्या चित्रकाराला त्याने खोल खोल खेचून नेले.हे सहज खेचून नेणे पुढे पुढे खूप जिव्हारी लागेल असे तेव्हा वाटलेच नाही.हे कलाकृतीच्या जिव्हारी लागण्यातूनच बांगड्यांच्या मोराचा जन्म झाला.पण जन्मानंतर मोर जोपासण्याचा जीवाला लागतो त्या घोराचे काय?

एकदा घोर लागला की खूप अघोरी कामं करावी लागतात.चकाचक भिंतीवर असले उद्योग करायचे म्हटले की आधी स्वतःच्या घराची भिंत निवडावी लागते.गल्ली बोळातून बांगड्यांच्या काचा हुडकाव्या लागतात.नाही सापडल्या तर विकत घ्याव्या लागतात.बांगड्यांचा बादशहा म्हणजे कासार. त्याची घनिष्ठ मैत्री करावी लागते.त्याचकडेच तर हा सप्तरंगी खजिना असतो ना!कासारसी संपर्क किंवा संवाद शक्यतो स्रियांचा असतो.पण बापूंनी मैत्री केली .कारण फुटलेल्या बांगड्या ह्या कासारसाठी निरुपयोगी आणि या अवलीयासाठी बहुमोल! स्वतःच्या घरातील तीन भिंतींवर बापूंनी या बांगड्यांच्या काचेचे प्रयोग केले आणि एक सुंदर ,चमकदार मोर तयार झाला.

आता यात आणखी कौशल्य प्राप्त करायचे असेल तर असले प्रयोग इतरांच्या भिंतींवर करायला नकोत का?जशी कविता-शिल्प-चित्र-साहित्य रसिक -वाचकासमोर गेली की लोकोत्तर होते तशी ही कला लोकात न्यायला नको का?मग काय घोरच घोर.एखाद्याचे घर निवडणे आलेच.तेही चांगल्या माणसाचे.जो स्वतःच्या घराची भिंत काचांनी रंगवून घ्यायाला तयार असला पाहिजे!त्याने बांगड्यांच्या काचांची व्यवस्था करायला हवी.त्याची आणि त्याच्या काराभरणीची बांगड्या भरणाऱ्या माणसाशी घसट असायला हवी.इतके जरी व्यवस्थित झाले तरी आणखी मोठे घोर असतातच.इतक्या नाजूक आणि वेळखाऊ कामासाठी व्यस्त वेळेतला नेमका कोणता वेळ द्यायचा?समजा मोर काढणे अर्धवट राहिले तर…?अशी खरकटी भिंत किती दिवस ठेवायची?पुन्हा त्याच्या घरी केव्हा जायचे? किती घोर ना!या घोरतूनच त्यांनी पूर्ण झाले जवळ जवळ ऐंशी मोर.तेही महाराष्ट्रातील विविध भागात .कविमित्र आणि संयोजकांच्या घरी.

फरपट कितीही असो.वेळ कितीही जावो.बापूंनी मुंबई पासून इंदोर पर्यंत असे मोर पूर्ण केले.सर्वात मोठा मोर साकारला तो अहमदनगरच्या अशोक काळे यांच्या घरात.पंधरा फूट लांब -रुंद आणि पंधरा फूट उंच.अशोक काळे यांच्या दुमजली घराची एक कॉमन भिंत आहे त्या मोठ्या भिंतीवर हे काम झाले.पाठ्यपुस्तक मंडळावर अध्यक्ष म्हणून काम करताना बापू सकाळी पुण्यातील बालभारतीच्या कार्यालयात सकाळी सकाळी हजर असायचे.काम संपल्या नंतर पुण्यातून सरळ अकोल्याला न जाता अहमदनगरला उतरायचे.पहाटे पर्यंत जागून मोर काढायचे आणि पहाटेच्या गाडीने अकोला गाठायचे.एका महाविद्यालयाचे प्राचार्यपद आणि पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्षपद असताना हे उद्योग सुरु होते.त्यात दिव्य असे की पंधरा फूट उंचीचा मोर काढायचा म्हटलं की शिडी आली. शिडीवर चढून रात्रभर अवघडल्या स्थितीत उभं राहायचं म्हणजे दिव्यच ना! पण अवलीयाचा आवाका सामान्यांच्या लक्षात येत नाही.पण अगदी टेबलावर शिडी ठेवून मोर काढल्याचे बापू सांगतात.पडतील,हातपाय मोडतील याची काहीच चिंता नाही.पण जोर आणि घोर एकत्र येतात तेव्हा कशाचेच भय उरत नाही.

भोसरी येथील मुरलीधर साठे यांच्या घरीही असाच सुंदर मोर आहे.ज्या ज्या साहित्यिक मित्रांच्या घरी हा मोर आहे त्यांना हा घोर ज्ञात आहे.कवितेसाठी फिरत असताना कुणाच्या घरी मोराचे काम अर्धवट आहे हा तर फार मोठा घोर.एखाद्याच्या घरी पुन्हा पुन्हा जाणे आपल्या सारख्याला संकोचाचे वाटेल.ते नैसर्गिकही आहे.पण घोर संकोच्याच्या पुढे गेलेला असतो.म्हणजे केवळ बापूंच्याच जीवाला नाही तर ज्यांनी हा मोर काढून घेतला त्यांच्याही जीवाला घोर.ज्यांच्या घरी बापू गेले त्यांना ना कधी संकोच वाटला ना कधी भार. कारण हा माणूस ज्यांच्या घरी जातो तेथे लहान सहान कामं करतो.अगदी घराभोवतीचे गवत निंदण्यापासून ते चिकन आणून देईपर्यंत.साताऱ्याला काष्ठ शिल्पकार अशोक जाधव यांच्या घरी असताना .एकदा अचानक वादळ वारा आला आणि पाऊस सुरू झाला.तेव्हा भाताच्या पेंढ्या वाहताना दमछाक होईपर्यंत बापूंनी त्या वाहून आणल्या. अवलीयाच ना…!

तारा आणि खिळ्यांपासून शिल्प तयार करणे.एक नव्हे दोन नव्हे रस्त्यावर फिरून दहा हजार काडेपेट्या गोळा करून त्यापासून मोठे कोलाज तयार करणे. वयाच्या सत्तरीनंतरही दिवसातले दहा तास लेखन करणे.या माणसाबद्दल सांगायलाअजून खूप काही आहे जे एका दमात सांगता येणार नाही.लीळाचरित्रातील संदर्भ आणि ज्ञानेश्वरीतले संदर्भ पडताळून अभ्यास करणारा आधुनिक निरीक्षक मला खूप आवडला.आंबेडकरांच्या चरित्रावर ओव्यांचाही संग्रह लवकरच येत आहे.अमृतमोहत्सवाच्या पुढे गेलेल्या बापूंना मस्तफकिरीत जगण्याचा हा घोरआणखी जिव्हारी लागो.