Take a fresh look at your lifestyle.

काय बोलता.. चक्क! सोन्यापेक्षा महाग चहा…

तब्बल 99 हजार 999 रुपयांना एक किलो चहा !

एक किलो चहाची किंमत असेल, असा प्रश्न विचारला तर आपण हजारामध्ये असे उत्तर देऊ. मात्र जर उत्तर लाखांमध्ये असेल तर अनेकांच्या भुवया उंचावतील एवढं नक्की. गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर (GATC) येथे एक किलो गोल्डन बटरफ्लाय चहा विक्रमी 99,999 रुपयांना विकला गेलाय. या चहाचे ब्रँडिंग ‘मनोहरी गोल्ड’ असे केले जाते.
‘मनोहरी गोल्ड टी’ने गुवाहाटी चहाच्या लिलावात स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला आहे. गेल्या वर्षी या चहाची एक किलोची 75 हजार रुपयांना विक्री झाली होती. डिब्रुगड जिल्ह्यातील हा चहा गुवाहाटी येथील घाऊक व्यापारी सौरभ टी ट्रेडर्स यांनी विकत घेतला होता. यंदा या एका किलोची 99,999 रुपयांची विक्रमी बोली लागली.
आसामच्‍या डिब्रुगड जिल्‍ह्यात ‘मनोहरी गोल्ड’ चहा तयार होतो. GATC च्या मते, भारतात लिलाव होणाऱ्या चहाची ही सर्वाधिक किंमत आहे. गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स असोसिएशनचे सचिव दिनेश बिहाणी यांनी बोलताना सांगितले की, लिलावात ‘मनोहरी गोल्ड टी’ 99,999 रुपये प्रति किलो दराने विकला गेलाय.
‘मनोहरी गोल्ड चहा’चे खरेदीदार सौरभ टी ट्रेडर्सचे सीईओ एमएल माहेश्वरी म्हणाले की, ‘मनोहरी गोल्ड’ चहाची मागणी जास्त आणि उत्पादन खूप कमी आहे. ‘मनोहरी टी’ इस्टेटतर्फे यंदा केवळ 1 किलो चहाचा लिलाव झाला. हा चहा घेण्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो. दरम्यान बागेच्या मालकाने वैयक्तिकरित्या विकण्यास नकार दिला मात्र आम्ही लिलावादरम्यान ते खरेदी करण्यास यशस्वी झालो..
2018 मध्ये याच ब्रँडचा 2 किलो चहा 39,000 रुपयांना विकला गेला होता. जो सौरभ टी ट्रेडर्सने खरेदी केला होता. एका वर्षानंतर, त्याच कंपनीने तोच चहा 50,000 रुपयांना विकत घेतला. मात्र गेल्या वर्षी 1 किलोचा भाव 75 हजार रुपये होता, जो विष्णू टी कंपनीने विकत घेतला होता.