Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेटमध्ये खेळाडू किती प्रकारे बाद होतो?

'हे' नियम वाचाच!

 

क्रिकेटमध्ये फलंदाज कशाप्रकारे बाद होतो? हे सर्वांना माहिती असते. यामध्ये त्रिफळाचीत, झेलबाद, धावबाद आणि पायचित, हे फलंदाजांचे बाद होण्याचे प्रकार आहेत. परंतु फलंदाजाला बाद करण्याच्या केवळ इतक्याच पद्धती नसून त्यांची संख्या एकूण 10 इतकी आहे. या सर्व प्रकारांचा आढावा या लेखात घेऊयात…
● झेलबाद : जेव्हा चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागतो आणि तो मैदानावर पडण्याआधी क्षेत्ररक्षक त्या चेंडूला पकडतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो. बाद होण्याचा हा सामान्य प्रकार आहे. 58.6 टक्के म्हणजे सर्वाधिक वेळा तर फलंदाज याप्रकारे बाद होतो.

● त्रिफळाचीत : गोलंदाज चेंडू यष्टीवर मारण्यात यशस्वी झाला की फलंदाज त्रिफळाचीत होतो. यालाच दांड्या उडवणे, बत्त्या गुल करणे असेही म्हटले जाते संबोधले. 21.3 टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद झाले आहेत.
● पायचित : जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो आणि फलंदाज तो शरीराच्या मदतीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी जर तो यष्टीच्या बरोबर पुढे असेल, तर तो फलंदाज पायचित होतो. मात्र यासाठी चेंडू यष्टीच्या दिशेने जाणे गरजेचे असते. 14.4 टक्के फलंदाज याप्रकारे बाद होतात
● धावबाद : जेव्हा फलंदाज चेंडूला मारल्यानंतर खेळपट्ट्यांच्या मधून धावत असतो आणि तो क्रिजमध्ये पोहोचण्या आत क्षेत्ररक्षक चेंडू अचूक यष्टीला मारतो, तेव्हा फलंदाज धावबाद होतो. अंदाजे 3.46 टक्के फलंदाज या प्रकारे बाद होतात.

● यष्टीचीत : जेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडू बॅटला स्पर्श न करता यष्टीरक्षकाकडे जातो. तेव्हा तो यष्टीरक्षक त्वरित चेंडू पकडून यष्टीला मारतो, तेव्हा फलंदाज यष्टीचीत होतो. क्वचितच म्हणजे 2.02 टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद होतो.
● हिट विकेट : जेव्हा फटका मारताना फलंदाजाची बॅट किंवा त्याच्या शरीराचा एखादा भाग यष्टीला लागतो आणि दांड्या उडून पडतात, तेव्हा फलंदाज हिट विकेट होतो. 0.230 टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद होतात.
● क्षेत्ररक्षणात अडथळा : जेव्हा एखादा फलंदाज क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला मुद्दाम अडवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना झेल टिपताना अडथळा निर्माण करतो, तेव्हा त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याच्या नियमानुसार बाद दिले जाते. केवळ 0.01 फलंदाज अशाप्रकारे बाद झाले आहेत.

● दुसऱ्यांदा चेंडूला मारण्यास : जेव्हा एखादा फलंदाज मुद्दाम चेंडूला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला बाद दिले जाते. जर चेंडू फलंदाजाच्या बॅट, शरीर किंवा हेल्मेटसारख्या कोणत्या गोष्टीला लागला आणि त्यानंतर त्याने मुद्दाम चेंडूला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पंच त्याला बाद देतात. अगदी क्वचित फलंदाज अशा पद्धतीने बाद होतो.
● टाईम आऊट : एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या नव्या फलंदाजाला 3 मिनिटांच्या आत मैदानात यावे लागते. आणि आपल्या जागेवर जाऊन थांबावे लागते. जर एखाद्या फलंदाजाने जास्त वेळ घेतला, तर त्याला टाईम आऊट नियमानुसार बाद दिले जाते. आत्ता पर्यंत 6 फलंदाज असे आऊट झाले आहेत.
● रिटायर्ड आऊट : जेव्हा फलंदाज पंचांना न सांगता मैदानाबाहेर निघून जातो आणि त्याच्याकडे मैदानाबाहेर जाण्याचे कारण नसते, तेव्हा पंच त्याला रिटायर्ड आऊट देऊ शकतात. सराव सामन्यांमध्ये फलंदाज चांगली खेळी केल्यानंतर रिटायर होतो. यामुळे इतर फलंदाजांना खेळण्याची संधी मिळते.