Take a fresh look at your lifestyle.

नगरपंचायत निवडणूकीत भाजपाच्या काही उमेदवारांची माघार !

राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबावतंत्राचा आरोप.

कर्जत : कर्जत नगरपंचायतीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी,भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यानिमित्ताने आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळुन आला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावत आमदार पवार यांनी माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना यापूर्वीच जोरदार धक्के दिले आहेत.आता तर नगरपंचायत निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या काही उमेदवारांनीही माघार घेतल्याने प्रा.शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी पवार यांच्यावर दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करत मौन आंदोलन सुरू केले.
कर्जत नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. मात्र ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने १३ जागांवरच निवडणूक होत आहे. त्यामध्ये भाजपच्या महत्त्वाच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतली. त्या जागांवरील निवडणूक बिनविरोध होऊन राष्ट्रवादीच्या जागा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संतापलेल्या शिंदे यांनी प्रथम या उमेदवारांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत त्यांची खडाजंगी झाली. शेवटी ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरासमोर ठिय्या देत मौन आंदोलन सुरू केले.
कर्जत नगर पंचायतीत उमेदवार अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता. ही निवडणूक आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे अस्तित्व दाखविण्याची परीक्षा मानली जाते. त्यामुळे दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
निवडणुकीच्या आधीपासून आमदार पवार यांनी भाजपला एका पाठोपाठ एक दणके दिले. भाजपमधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे नव्या उमेदवारांना घेऊन भाजपने निवडणूक लढविण्याची तयार केली. मात्र आज त्यातील काहींनी अंतिम क्षणी माघार घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणला गेला. त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
यावरून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व प्रा.राम शिंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर प्रा. शिंदे यांना गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले. यासंबंधी राम शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदारांच्या दबाव व दडपशाहीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी अर्ज काढले. त्यामुळे संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरासमोर न्याय हक्कासाठी मौन ठिय्या आंदोलन करीत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृतपणे काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रांताधिकाऱ्यांनी दबावाचे आरोप फेटाळून लावले आहेत. नियमानुसारच प्रक्रिया होत असल्याचे त्यांनी सांगितले.