Take a fresh look at your lifestyle.

शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा !

उरळगावच्या नीता सात्रस यांनी पटकाविला 'मिसेस इंडिया 2021' किताब !

✒️ सतीश डोंगरे
शिरूर : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील नीता सात्रस यांना यावर्षीचा ‘मिसेस इंडिया 2021’ हा मानाचा किताब प्राप्त झाला आहे. या किताबामुळे शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नीता सात्रस या उरळगावचे सरपंच सुनील सात्रस यांच्या पत्नी आहेत. ग्रामीण भागातील एका महिलेला हा किताब मिळण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे.
दिव्या पँजेंटतर्फे सलग तिसऱ्या वर्षी ‘मिसेस इंडिया 2021’ स्पर्धेची अंतीम फेरी पुण्याच्या कल्याणीनगर येथील पंचतारांकित हॉटेल हयात मध्ये पार पडली. अंजना व कार्ल मास्केरन्हस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण 31 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे विनय आरान्हा प्रमुख प्रायोजक होते. जहांगीर डेंटल ओरा केअर सहप्रायोजक होते.
उरळगावच्या नीता सात्रस या स्पर्धेत सहभागी झाल्यापासून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अंतिम निकाल येताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियातून नीता सात्रस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेसाठी अभिनेत्री मेहक चहल, रितू शिवपुरी, पवित्रा पुनिया, अभिनेते स्वप्निल जोशी, विनय आरान्हा, आकाश शाह, कार्ल मास्केरन्हस आदींनी परिक्षक म्हणून काम पाहिले. ‘मिसेस इंडिया एम्प्रेस आॅफ द नेशन’ या फेसबुक पेजवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी नीता सात्रस यांचे विशेष अभिनंदन केले आहे.