Take a fresh look at your lifestyle.

वाघोबाच्या नुसत्या नावानेच वऱ्हाडी मंडळींची हवा झाली टाईट !

नवरा नवरीही रस्ता दिसेल तिकडे पळाले.

खामगाव : गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला वाघाचं दर्शन घडतच असते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीत धामधूमीने लग्नसोहळा सुरू असलेल्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे. ऐन मुहूर्ताच्या वेळी परिसरात वाघाने शिरकाव केल्याची चर्चा सुरू झाल्याने नवदांप्त्यासह वऱ्हाडी मंडळींची हवा पुरतीच टाईट झाली आहे.
वाघाच्या भीतीने संबंधित दांम्पत्याला बंद खोलीतच लग्नगाठ बांधावी लागली. मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची स्वप्न पाहणाऱ्या दाम्पत्याचा मोठा भ्रमनिराश झाला आहे. बंद खोलीत लग्न उरकल्यानंतर, त्याच खोलीत जेवणाच्या पंगती बसवण्यात आल्या. वाघाच्या दहशतीमुळे बंद खोलीत लग्न करावे लागल्याने परिसरात या लग्नाबाबत खमंग चर्चा रंगत आहेत.
खरंतर, गेल्या आठवडाभरापासून खामगाव परिसरात वाघ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दररोज कोणाला ना कोणाला तरी वाघाचं दर्शन घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र वाघ सापडत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये वाघाची भीती अधिकच गडद होतं होती. अशात रात्री घाटपुरी नाका परिसरात वाघ घुसल्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली.अशात याच परिसरात एकेठिकाणी लग्नाची धामधूम सुरू होती. गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी विवाहस्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांना पाहून पाहुणे मंडळीमध्ये घबराट सुरू झाली. यामुळे नवरी नवरदेवासह वऱ्हाडींनी रस्ता दिसेल तिकडे पळायला सुरुवात केली.
ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी वाघाचं व्यत्यय आल्याने, ज्येष्ठांनी पुढाकार घेत, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत एका बंद खोलीत हा विवाह पार पाडला आहे. अक्षता पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीही त्याच खोलीत बसवल्या. दरम्यान अन्य वऱ्हाडी मंडळींना शेजारच्या लोकांनी आसरा दिला होता.